भाजपा निवडणूक प्रमुखपदी राजनाथसिंह

नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळे त्यांनी पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून आपल्याकडे असलेला कार्यभार सोडला आहे आणि त्यांच्या जागी आता पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी गोव्यात झालेल्या भाजपाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्याकडे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठीचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. ते पद त्यांनी आता सोडले आहे.

नरेंद्र मोदी हे स्वत:च पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या पंतप्रधानपदासाठी होणार्‍या प्रचाराचे प्रमुख व्हावे हे काही योग्य नाही, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. पक्षाच्या सांसदीय मंडळाच्या बैठकीत त्यांनी आपण हे पद सोडत असल्याचे जाहीर केले आणि त्याचवेळी या पदासाठी राजनाथसिंह यांचे नाव जाहीर केले. मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या नावाला एकमुखी पाठींबा दिला.

भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अनंतकुमार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पक्षाच्या प्रचार प्रमुखाच्या नेतृत्वाखाली २० पोट समित्या कार्यरत असून त्या सर्व समित्यांचे नेतृत्व एकेका ज्येष्ठ नेत्याकडे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.