न्यूयॉर्क – भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्यामुळे ही अर्थव्यवस्था २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात सार्या संकटांवर मात करून सावरेल, असा विश्वास पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. या सहा वर्षातल्या कामगिरीच्या जोरावर चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा ८ ते ९ टक्के विकास दर गाठला जाईल, अशीही खात्री त्यांनी दिली.
भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत संकटातून बाहेर पडण्याचा पंतप्रधानांना विश्वास
व्यापारी तोटा आणि अर्थसंकल्पीय तूट ही दोन आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर उभी आहेत. तेव्हा चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तूट वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.८ टक्क्यांपर्यंत खाली आणणे शक्य होईल. त्याचबरोबर आयात-निर्यात व्यापारातील तोटा वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडीच टक्क्यापर्यंत खाली आणता येईल असे ते म्हणाले.
भारताच्या अर्थव्यवस्थेपुढे काही अडचणी आहेत. परंतु सरकार त्यावर उपाय योजीत आहे आणि त्या उपायांचे परिणाम येत्या सहा महिन्यात दिसायला लागतील, असे पंतप्रधानांनी सांगितले. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये विकास वेग ४.४ टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी पाच वर्षातील सरासरी विकास वेग आठ टक्के नोंदला गेला आहे, असे त्यांनी नमूद केले.
