नाट्यपरिषदेने संमेलनाध्यक्षपदासाठी सुचविले किर्ती शिलेदारांचे नाव

पुणे, – आगामी नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने ज्येष्ठ संगीत नाट्य अभिनेत्री, गायिका किर्ती शिलेदार यांचे नाव मध्यवर्ती शाखेकडे पाठविण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी शनिवारी दिली.

नाटय परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी राज्यातील सर्व शाखांना अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार अध्यक्षपदासाठी नाव सुचविण्याची 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे शाखेच्या पदाधिकार्‍यांची बैठक गुरुवारी झाली होती, त्यामध्ये ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार आणि लोकरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी या तीन नावांची बैठकीमध्ये चर्चा झाली होती. मात्र, ही तीनही नावे पाठवायची की यापैकी एक नाव नाटय परिषदेकडे कळवायचे यावर एकमत झाले नाही त्यामुळे शनिवारी पुन्हा ही बैठक पार पडली.

यासंदर्भात बोलताना देशमुख म्हणाले, मधवर्ती शाखेने दिलेल्या पत्रानुसार आज अम्ही पुणे शाखेच्या वतीने किर्ती शिलेदार यांचे नाव सुचविले आहे. परिषदेच्य आजच्या बैठकीत ज्येष्ठ अभिनेत्री लिला गांधी यांनी माघार घेत्तल्यानंतर शिलेदार यांच्या नावावर परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी एकमत दर्शविले. दरम्यान, आगामी नाटयसंमेलनासाठी नागपूर, सातारा आणि पंढरपूर अशा तीन ठिकाणची निमंत्रणे आली आहेत. त्यानुसार नाटय परिषदेच्या स्थळ निवड समितीने दोन ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. आता नाटय परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक 6 ऑक्टोबर रोजी होत आहे. या बैठकीमध्येच संमेलनाचे स्थळ आणि आगामी नाटयसंमेलनाध्यक्ष निश्चित केले जाणार असल्याचे समजते.