नवी दिल्ली – भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीमध्ये होणार्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू आहे. याच सभेमध्ये नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीतील रोहिणी भागातील या सभेसाठी नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने येणार असून त्यांच्यासाठी या भागात स्वतंत्र हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. या सभेला पाच लाख जमतील, असा अंदाज आहे.
मोदींच्या दिल्लीतील सभेची जोरदार तयारी
जापनीज पार्क या मैदानावर ही सभा होईल. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विजय गोयल या सभेच्या तयारीसाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. ही सभा दिल्लीत होणार असल्यामुळे दिल्लीतील परदेशी वकिलातीतील अनेक अधिकारी या सभेला येतील आणि ४० उच्चायुक्त हजर राहतील असे समजते. काही नामवंत खेळाडू, सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आणि निवृत्त सरकारी अधिकारी यांनाही या सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी यांचे १०० फूट उंचीचे कटआऊट खास करून या सभेसाठी तयार करण्यात आलेले आहे. सभेच्या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून २० ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवलेले आहेत. सभेच्या बाहेर दिल्ली शहरामध्ये इतरत्र १०० एलईडी स्क्रिन बसवले जाणार आहेत. त्यामुळे सभेच्या ठिकाणी न येता सुद्धा दिल्लीतल्या अनेक लोकांना त्यांच्या घरी बसून भाषण ऐकता येणार आहे. वाहनांची तयारी मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेली आहे.
