नवी दिल्ली- काही पक्षाकडून धार्मिक दंगलींना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या पक्षांनी आगामी काळात दंगलीचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले. सोमवारी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले, ‘कोणत्याही स्वरुपाची छोटी हिंसक घटना प्रशासनाने तातडीने रोखली पाहिजे. त्याचबरोबर जबाबदार व्यक्तींना लवकरात लवकर शिक्षा केली जायला हवी. दोषी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित किंवा कितीही शक्तीशाली असले, तरी त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई व्हायलाच हवी. धार्मिक दंगलींमुळे निवडणुकीत कोणाचे नुकसान होणार आणि कोणाला फायदा होणार ही चर्चा दुर्भाग्यपूर्ण आहे. धार्मिक दंगलींमुळे कोणालाच फायदा होत नाही. त्यामुळे या स्वरुपाच्या दंगलींना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये आणि राजकीय फायदा उठविण्याचाही प्रयत्न करू नये.’
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना नवनवीन माहिती मिळते. मात्र, काही समाजकंटकांकडून या माध्यमाचा दुरुपयोग केला जातो. त्यामुळेच सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासोबतच नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे कामही आपल्याला करावे लागेल. एकात्मता परिषदेमध्ये यावर विचारमंथन व्हायला हवे, असेही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले.