परिवर्तनसाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज- मोदी

गांधीनगर- पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला हटविण्यासाठी १९७७ प्रमाणे २०१४ मध्ये नागरिकांनी पुढे येऊन परिवर्तन करण्याची गरज असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. रविवारी परदेशातील भारतीय नागरिकांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मोदी यांनी युपीए सरकारवर तोफ डागली आहे.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशाचा विकासदर ८.४ टक्के होता, आता तो यूपीए सरकारच्या काळात ४.८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे सध्याच्या या परिस्थितीतून फक्त भाजपच देश वाचवू शकतो. कारण, भाजप कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असून देशाला सर्वोतोपरी चांगले करण्याची तयारी आहे. यूपीए सरकारने गेल्या नऊ वर्षांतील कामकाजाचा आढावा जनतेसमोर मांडावा. या सरकारने देशाला खाली नेले आहे. भाजप सरकार येण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून लढवण्याची गरज आहे.’

आगामी काळात होत असलेली लोकसभा निवडणूक ही पद मिळविण्यासाठी लढविणार नसून, सामान्य नागरिकांचे अश्रू पुसण्यासाठी लढविणार आहे. त्यामुळे परदेशात वास्तव्यास राहत असलेल्या नागरिकांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असे भावनिक आवाहनही मोदी यांनी परदेशात राहणा-या भारतीय नागरिकांना केले.