ब्लॅकबेरी नुकसानीत – ४५०० जणांच्या नोकर्‍या जाणार

टोरंटो – एकेकाळी अमेरिके चे अध्यक्ष बराक ओबामा, याहू सारख्या कंपनीतील कर्मचारी ब्लॅकबेरी फोनच्या प्रेमात आकंठ बुडाले होते मात्र आज या कंपनीची अवस्था बिकट बनत चालली आहे. कंपनीला प्रंचड प्रमाणात तोटा होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी कंपनीला कामगार कपात करण्याची वेळ आली असून सुमारे ४५०० कामगार कमी केले जातील असे संकेत मिळत आहेत.

अॅपलच्या आयफोन आणि सॅमसंगच्या गॅलॅक्सी स्मार्टफोनशी स्पर्धा करण्यासाठी ब्लॅकबेरी झगडत आहे मात्र त्यांना त्यांचे झेड १० स्मार्टफोन बाजारात आणूनही या स्पर्धेत टिकणे अवघड बनले आहे. ऑगस्ट २०१३ अखेर कंपनीचे नुकसान ९५० दशलक्ष डॉलर्सवर गेले असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीकडील ग्राहकांचा ओढा मंदावला आहे तसेच कंपनीच्या शेअरचे दरही घसरत चालले आहेत. मार्च अखेर कंपनीत २० हजार कामगार होते ती संख्या आता १२,७०० वर आली असल्याचेही समजते.

कंपनीने यापुढे हार्डवेअर, सॉफ्टवेअर व सेवा क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याचे ठरविले असल्याचेही सांगितले जात आहे.