ओशोंचे मृत्युपत्र उघड – भक्तांतच संपत्तीसाठी वादावादी

पुणे – रजनीश ओशो यांच्या मृत्यूनंतर तब्बल २३ वर्षांनंतर त्यांचे मृत्यूपत्र उघड करण्यात आले आहे. त्यात नमूद केल्याप्रमाणे १ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्तीसाठी भक्तगणांतच हाणामारी सुरू झाली आहे. ओशो आश्रमातील दोन ट्रस्टींनी पुणे कोर्टात या मृत्यूपत्रासंदर्भात दावा दाखल गेला असून तो २४ सप्टेंबर रोजी चालविला जाणार असल्याचेही समजते.

विशेष म्हणजे १९ जानेवारी १९९० रोजी राजनीशांचे निधन झाले तेव्हा कोणत्याच ट्रस्टींनी त्यांच्या मृत्युपत्राचा उल्लेख केला नव्हता. मात्र आता अचानक २३ वर्षांनंतर युरोपियन युनियन कोर्टासमोर हे मृत्युपत्र दाखल केले गेले आहे. भारतात असलेला दुसरा गट व ओशांचे लक्षावधी भाविक यामुळे हैराण झाले आहेत. या मृत्यूपत्रावर ओशेांनी स्वतः १६ जून १९८९ रोजी सही केली असून ट्रस्टच्याच दोन सदस्यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत. परदेशी भक्तांनी ओशोंनी सर्व संपत्ती नियो संन्यास इंटरनॅशनल फौंडेशनच्या नावाने केल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे ओशो फ्रेडस फौंडेशनने या मृत्यपत्राला आव्हान दिले आहे. असे आव्हान दिले नाही तर सारी संपत्ती भारताबाहेर जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. पुणे येथील ओशो ग्रंथालयात सुमारे ८० हजार पुस्तके आहेत. त्याचबरोबर १८७० तासांचे ओशेंाचे व्हीडीओ, ६५ भाषात पुस्तक प्रकाशनासाठीचे हक्क, ८५० पेटींग्ज व कोरेगांव पार्क येथील आश्रमाची जागा अशी ही संपत्ती असून त्याची किंमत १ हजार कोटींहीन अधिक आहे. शिवाय ओशो फौंडेशन इंटरनॅशनल वर्षाला चार कोटी रूपयांची कमाई करत असते असेही समजते..

ओशेाच्या आश्रमाची जागा विकण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला गेला आहे. २००१ सालात ही जागा गोदरेज प्रॉपर्टीला देण्यासंबंधी बोलणी सुरू होती व त्यातील कांही जागा विकलीही गेली होती असेही समजते.