दुबई – दुबई प्रशासनाने अबूधाबी येथील खासगी भारतीय शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. या शाळेतील 1 हजार 300 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. इंडियन इस्लामिक स्कूल असे या शाळेचे नाव असून या शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांना 15 सप्टेंबर रोजी पत्र पाठवून अबूधाबी शिक्षण मंडळाचा शाळा बंद करण्याचा आदेश कळविला आहे.
दुबईत भारतीय शाळा बंद करण्याचा आदेश
शाळा बंद करण्याच्या आदेशाविषयीचा फलकही शाळेबाहेर लावण्यात आला आहे. शाळा बंद करण्याचा आदेश दिल्याने भारतीय विद्यार्थ्यांचे पालक चिंतित झाले आहेत. शाळेने अचानक बंद करण्याचा निर्णय कळविल्याने पालकांना धक्का बसला आहे.
मुख्याध्यापक मोहसीन के. यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेत 1 हजार 310विद्यार्थी शिकत आहेत. ते म्हणाले, शाळेला बंद करण्याचा आदेश जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाला. शाळा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल. तसेच शिक्षण मंडळाशी या विषयावर चर्चा सुरू असून, त्यांना मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
