अहमदाबाद मध्ये २००८ साली झालेल्या २१ बॉंबच्या बॉंबस्फोट मालिकेतला प्रमुख आरोपी अफझल उस्मानी हा न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला आहे. त्याला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या सोबत अन्य २२ आरोपीही होते. त्या सर्वांना मुंबईच्या न्यायालयात आणले जात असतानाच रस्त्यात तो न्यायालयाच्या आवारातून पोलिसांना चुकवून पळाला. आता त्याच्या विरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आले असून राज्य शासनाने या गलथानपणाबद्दल दोघा शिपायांना सेवेतून निलंबित केले आहे. केन्द्र सरकारने या संबंधात राज्य सरकारच्या गृहखात्याला नोटीस पाठवली असून हा प्रकार कसा घडला याचा अहवाल द्यायला सांगितले आहे. एकंदर झाला तो प्रकार चिंेताजनक आहे. महाराष्ट्रातले पोलीस किती बेजबाबदार आहेत याचे दर्शन अनेकदा घडत असते. ते आताही घडले आहे. आसामातल्या दंगलीचा निषेध करण्यासाठी रजा अकादमीने मुंबईत मोर्चा काढला होता तेव्हा या मोर्चात सहभागी होणारे लोक तलवारी घेऊन लोकलमधून आली होती. तेव्हाही या पोलिसांची लायकी उघड झाली होती.
गाफिलपणाची फळे
आज बरोबर महिन्यांपूर्वी अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांची हत्या झाली. या घटनेला महिना झाला तरी पोलिसांंना त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. यातच या पोलिसांची कार्यक्षमता दडली आहे. या निमित्ताने लोकांत नाराजी व्यक्त होत असतानाच नेमकी आजच ही संशयित अतिरेकी पळून जाण्याची घटना घडल्याने पोलिसांची पुरेशी नामुष्की झाली आहे. उस्मानी हा अतिरेक्यांचा हस्तक होता असा त्याच्यावर आरोप आहे. २००८ साली अहमदाबादेत २१ बॉंबस्फोटांची मालिका झाली होती आणि तिच्यात ५७ लोक मारले गेले होते. त्यानंतर अशीच मालिका घडवण्याचा बेत सुरतमध्येही आखण्यात आला होता. उस्मानी हा कार चोरण्यात वाकबगार होता आणि त्याने या स्फोटांसाठी चोरलेल्या कार पुरवल्या होत्या. त्याला कार बॉंबच्या स्फोटात फार मजा वाटत असे. त्यातल्या त्यात सीएनजीवर चालणार्या गाड्या चोरण्यात त्यांना फार रस होता. कारण या गाड्यांत बॉंब ठेवून त्याचा स्फोट केला की, बॉंबचाही स्फोट होतो आणि गाडीत इंधन म्हणून वापरल्या जाणार्या सीएनजी गॅसचाही स्फोट होतो. उस्मानी याला न्यायालयात आणताना फार सावधगिरी बाळगायला हवी होती कारण त्याच्या नावावर असे पळून जाण्याचे दोन गुन्हे दाखल होते.
मुळात तो २००८ सालच्या स्फोटात होता तरीही त्याला २०११ च्या ऑगष्टमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतरही त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि तो फसला होता. आता त्याने पुन्हा एकदा पळून जाण्याची कोशीश केली आणि तिच्यात त्याला यश आले. तो मुळात स्फोटानंतर लवकर सापडला नव्हता, पण जेव्हा त्याला पकडण्यात आले तेव्हा त्याने पळून जाण्याचाच प्रयत्न का केला, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. त्यामागे एक कारण आहे. त्याचा मोठा भाऊ फैज उस्मानी हा पोलिसांच्या ताब्यात असताना कोठडीतल्या छळाला बळी पडला होता. किंबहुना त्याला पोलिसांनी ठरवून मारले आहे असा उस्मानीचा आरोप होता. आपल्या भावाप्रमाणे आपल्यालाही पोलीस कोठडीत मारून टाकतील अशी भीती त्याला सातत्याने वाटत होती आणि म्हणून तो पळून जाण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा. त्याचा प्रयत्न काल यशस्वी झाला. आपला या कोणत्याही आरोपाशी काहीही संबंध नाही असे त्याचे म्हणणे आहे. अर्थात प्रत्येक आरोपी असेच म्हणत असतो पण उस्मानीने सातत्याने आपला संबंध नाकारला आहे. अफझल उस्मानी १९९३ सालपासून गुन्हेगारी विश्वाशी संबंधित आहे. तो अट्टल कार चोर असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो उत्तर प्रदेशातला राहणारा असून त्याच्यावर पूर्वी बेकायदा गोळीबार केल्याचे आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत.
अशा या धोकादायक आरोपीला न्यायालयात नेले जात असताना पोलिसांंनी त्याच्यावर विशेष पाळत ठेवायला हवी होती कारण त्याच्या नावावर पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पण आपल्या पोलिसांत बेफिकिरी वाढलेली आहे. आधीच तर दहशतवादी कारवायांत गुंतलेले आरोपी सापडत नाहीत. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदत मिळत असल्यामुळे ते बनावट पासपोर्ट तयार करून घेऊ शकतात आणि भारतात गुन्हे करून परदेशात पळून जाऊ शकतात. अशा अवस्थेत त्यांना पकडणे ही मोठीच गोष्ट असते. तशातच हाती सापडलेले आरोपी असे पळून जायला लागले आणि त्याबाबत आपण गाफील रहायला लागलो तर आपल्याला अतिरेक्यांचा कधीच बंदोबस्त करता येणार नाही आणि दहशतवादी कारवायाही बंद पाडता येणार नाहीत. महाराष्ट्रातले पोलीस फार कार्यक्षम असल्याचा दावा केला जातो पण ते या दाव्याला पात्र नाहीत असे अनेकदा दिसून आले आहे. २००६ साली त्यांच्या हातातून असाच एक आरोपी न्यायालयात नेले जात असतानाच त्यांच्या हातातून निसटला होता.
