सर्वेक्षणातले संकेत

भारतात निवडणूकपूर्व सर्वेक्षणांच्या सुरूवातीच्या काळात या सर्वेक्षणातले अंदाज सपशेल चुकत असत पण गेल्या दोन निवडणुकांत हे अंदाज तंतोतंत नसले तरीही काही प्रमाणात बरोबर उतरायला लागले आहेत. त्यामुळे सर्वेक्षणांची विश्‍वासार्हता प्रस्थापित होत असून त्यांच्यामुळे निवडणुकांच्या निकालांचा काही प्रमाणात का होईना अंदाज यायला लागला आहे. त्यातल्या त्यात टाइम्स ऑफ इंडिया सारख्या प्रतिष्ठित दैनिकाला तर अशी सर्वेक्षणे फार बारकाईने करावी लागतात. टाइम्सने एका मार्केटिंग संस्थेने असे एक सर्वेक्षण केले असून पुढच्या महिन्यात होणार्‍या चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कसा असेल याचा अंदाज घेतला आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष भारतीय जनता पार्टीतला उत्साह वाढावा असे आहेत. दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या चार राज्यातील तीन विधानसभा निवडणुका भाजपाला जिंकता येतील आणि एका राज्यात कॉंग्रेसला आपले स्थान टिकवता येईल असे निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघाले आहेत. १९९८ पासून लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच या चारही राज्यातल्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकी आधीची सेमीफायनल मॅच समजले जाते.

विशेष म्हणजे केंद्रातील सत्तेसाठी शड्डू ठोकून उभे राहणार्‍या भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन राजकीय पक्षांची या चार राज्यात थेट लढाई असते. या चारही राज्यामध्ये राजकारणाचे ध्रुवीकरण भाजप आणि कॉंग्रेस या दोन पक्षात झालेले आहे. तिथे तिसरा प्रभावी पक्ष लढाईच्या मैदानात नसतो. त्यामुळे दिल्लीच्या या दोन दावेदारांपैकी कोणाची सरशी या चार राज्यांमध्ये होते याला लोकसभेच्या दृष्टीने महत्त्व आलेले असते. सध्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भाजपाची सरशी होईल असा निष्कर्ष निघाला आहे. सध्या या चारपैकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश ही दोन राज्ये भाजपाकडे आहेत. तर दिल्ली आणि राजस्थान ही दोन राज्ये कॉंग्रेसकडे आहेत. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये भाजपाला सत्ता राखण्यात यश मिळणार आहे. कॉंग्रेसला दिल्लीतले सरकार मात्र वाचवता येईल असे दिसत आहे. राजस्थानात मात्र कॉंग्रेसची सत्ता जाईल असे या सर्वेक्षणाचे मत आहे. दिल्लीमध्येसुध्दा कॉंग्रेसला सत्ता राखता येणार असली तरी ती म्हणाव्या तेवढ्या निर्विवादपणे राखता येणार नाही. भारतीय जनता पार्टीपेक्षा एक दोन जागा जास्त मिळतील.

अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष कॉंग्रेस आणि भाजपा दोघांच्याही तोंडचा घास हिरावून घेईल आणि दोन्ही पक्षाला बहुमतासाठी केजरीवाल यांची मनधरणी करावी लागेल. असे असूनही विजयाचा काटा थोडा कॉंग्रेसकडेच जास्त झुकलेला आहे. या मागचे एकमेव कारण म्हणजे शीला दीक्षित. शीला दीक्षित यांनी १९९८ साली दिल्लीतली भाजपाची सत्ता हिसकावून घेतली आणि तेव्हापासून भाजपाला ती परत मिळवता आली नाही. गेल्या वर्षी दिल्लीच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा दारूण पराभव झालेला आहे. पण तरीही विधानसभेच्या निवडणुकीत मात्र शीला दीक्षितच बाजी मारतील असे या निष्कर्षांचा अभ्यास करणार्‍यांना वाटते. कारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण्या एका व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव नसतो. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र व्यक्तिमत्वाचा प्रभाव असतो. शीला दीक्षित यांच्या व्यक्तिमत्वावर मात करील असा नेता भाजपाला मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत उत्तम यश मिळविलेल्या भाजपाला दिल्ली विधानसभेतली सत्ता थोडक्यात आपल्या हातून जाताना पहावी लागेल.

२००३ साली राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीने कॉंग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून घेताना दोन तृतीयांश बहुमत मिळवले होते. भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यातली सत्ता मिळाली होती. २००८ साली राजस्थानात भाजपाला अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता गमवावी लागली. आता पुन्हा एकदा वसुंधरा राजे यांनी पदर खोचला आहे. शिवाय राजस्थानामध्ये अशोक गेहलोत यांचा कारभार तंतोतंत मनमोहन सिंग यांच्यासारखा झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी यावेळी थोडी अधिक आक्रमकपणे मैदानात उतरत आहे. त्यामुळे सर्वेक्षणात राजस्थानात भाजपाला उत्तम यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यामध्ये २००३ आणि २००८ या दोन्ही निवडणुका भाजपाने जिंकल्या आणि १३ सालची ही निवडणूकसुध्दा भाजपाला विजयी करणार असा अंदाज आहे. या दोन राज्यातले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि रमणसिंग या दोघांनीही चांगल्या प्रशासनाचे दर्शन घडवले आहे. त्याशिवाय या दोन्ही राज्यात कॉंग्रेसशिवाय कोणाचाही म्हणावा तसा प्रभाव नाही. त्यामुळे भाजपाला या दोन्ही राज्यांत विजयाची शक्यता आहे.