कोची विमानतळावर दोन महिलांकडून २० किलो सोने जप्त

कोची – शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दुबईहून आलेल्या दोन महिलांकडून कोची विमानतळावर सीमा शुल्क विभागाने चोरून आणलेले २० किलो सोने जप्त केल्याचे वृत्त आहे. एक एक किलोच्या वीस लगडींचा त्यात समावेश असून या महिलांनी या लगडी खास शिवून घेतलेल्या जाकिटाच्या अनेक खिशांतून लपविल्या होत्या व या दोघींनीही बुरखा घातला होता. या दोन्ही महिला थिस्सूर व कोझीकोडे येथील रहिवासी असल्याचे समजते.

या संबंधी कस्टम विभागाला खबर मिळाल्यावर कस्टम अधिकार्‍यांनी कोची विमानतळावर पाळत ठेवली होती.एमिरेटसच्या विमानातून या महिला कोची विमानतळावर उतरल्या. त्या सहा दिवसांपूर्वीच दुबईला गेल्या होत्या. त्यांनी लपवून आणलेले सोने कस्टम अधिकार्‍यांनी जप्त केले असून त्याची बाजारातील किंमत ५ कोटी ८० लाख रूपये इतकी आहे. हे सोने रितसर कायदेशीर मार्गाने आणले गेले असते तर त्यावर ६० लाख रूपये ड्यूटी भरावी लागली असती असेही या अधिकार्‍यांकडून समजते. अलिकडच्या काळात तस्करी करून आणलेला व कस्टम विभागाकडून पकडला गेलेला हा सर्वात मोठा साठा आहे.