आता पाकिस्तानी कांदा महाराष्ट्राच्या बाजारात

मुंबई – महाराष्ट्रासह सर्व देशातच निर्माण झालेल्या अभूतपूर्व कांदा टंचाईमुळे बाजारात कांद्याचे भाव ८० ते १०० रूपये किलोंवर पोहोचले आहेत. यावर उपाय म्हणून व्यापार्‍यांनी इजिप्तमधून कांदा आयात केली आहे तसेच वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पाकिस्तानातून आलेला ५६ टन कांदा दाखल झाला आहे. कांदा व्यापारी इस्लाम अद्रेशी यांनी आयात केलेला हा कांदा २० किलोंच्या गोण्यातून कराची बंदरातून मुंबईत आणला गेला आहे. पाच ट्रकमधून हा कांदा पहाटे वाशी बाजारात दाखल झाला असल्याचे समजते. हा कांदा ४५ ते ४८ रूपये किलोने ठोक बाजारात विकला जात आहे.

अद्रेशी म्हणाले की पाकिस्तानी कांदा चांगल्या प्रतीचा असला तरी तो भारतीय कांद्याइतका चांगला नाही. मात्र पाकिस्तानातून कांदा आयातीची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वीही कांदा दराने असाच उच्चांक नोंदविला असतानाही कराची कांदा आयात केला गेला होता. त्यावेळी तो जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून कंटेनरमधून आणला गेला होता. आत्ताचा कांदा कराचीहून सम्रुद्रमार्गेच आला असून तो पोहोचण्यास चार दिवस लागले आहेत. वीस किलोत १-२ किलो कांदा सडका आहे.

ठोक बाजारात भारतातील कांदा ५८ ते ६० रूपये किलो असून पाकिस्तानी कांदा ४५ ते ४८ रूपये आहे. कर्नाटकातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून हा नवा कांदा ५२ ते ५५ रूपये किलोने विकला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र कांदा ८० ते १०० रूपये किलोनेच खरेदी करावा लागत आहे.