नवी दिल्ली – सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंग आणि राहुल गांधी यांनी देशात घडणार्या घटनांवर आक्रमकपणे मतप्रदर्शन केले आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या पाहिजेत असे ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना प्रतिपादन केले. अशा प्रकारचे मतप्रदर्शन केल्याशिवाय जनतेशी संपर्क होत नाही आणि संपर्काशिवाय आक्रमक राजकारण होत नाही असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मनमोहनसिंग हे कमी बोलतात मात्र ते बोलल्यानंतर विरोधी पक्षांची विशेषतः भारतीय जनता पार्टीची बोलतीच बंद होते. परंतु पंतप्रधान असे फारसे बोलत नाहीत. याबद्दल जयराम रमेश यांनी खेद व्यक्त केला. असे असले तरी हे तिनही कॉंग्रेसचे नेते योग्य वेळी नक्कीच बोलतील असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले असले तरी त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला कसलीच चिंता वाटत नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेस हा जुना पक्ष आहे आणि त्याच्या कडे लोकांना सांगण्यासारखे बरेच काही आहे. फक्त गरज आहे ती या गोष्टी लोकांना आक्रमकपणे सांगण्याची. भारतीय जनता पार्टीकडे सांगण्यासारखे काहीच नाही परंतु ते तीच गोष्ट आक्रमकपणे सांगत असतात. असे जयराम रमेश म्हणाले.