जगातील सर्वात छोटी व रस्त्यावरून धावू शकणारी, सुरक्षेचे सर्व नार्म पूर्ण केलेली आगळी कार गिनीज रेकॉर्डमध्ये नोंदली गेली आहे. केवळ २५ इंच उंचीची, चार फूट लांब व पावणे दोन फूट रूंदीची ही कार कस्टम कार मेकर म्हणून ओळख असलेल्या आर्स्टीन कोलरून याने तयार केली असून ही गाडी रस्त्यातून तो कायदेशीर रित्या चालवूही शकणार आहे.
ऑस्टीन सांगतो, गिनीज रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद व्हावी अशी त्याची फार इच्छा होती. त्याला वाहन क्षेत्रात अत्यंत रूची असल्याने यातच कांही तरी रेकॉर्ड नोंदवावे असे त्याच्या मनाने घेतले आणि -आय अॅम बिग- असे नांव धारण केलेली ही कार प्रत्यक्षात अवतरली. ही कार बनविण्याआधी ऑस्टीनने मागचे रेकॉर्ड पाहिले आणि आपण हे रेकॉर्ड मोडू शकतो अशी त्याची खात्री पटली.
रस्त्यावरून ही कार चालवायची तर त्यासाठी प्रथम नोंदणी आवश्यक होती. वाहतूक विभागाकडून तपासणी होणे गरजेचे होते. रस्त्यावर ही कार चालविणे सुरक्षित आहे यासाठी जे कांही नॉर्म ठरविले गेले आहेत ते सर्व या कारमध्ये आहेत. सेफटी ग्लास विंडशिल्ड, सिग्नल लाईट, सीट बेल्ट, चालू स्थितीतील हॉर्न, वायपर आदि सर्व आवश्यक गोष्टी या कारमध्ये असल्याने ती रस्त्यावर चालविण्याची ऑस्टीनला परवानगी मिळाली आणि त्याने ती चालवून गिनीजमध्ये विक्रम नोंदविला.