काळ्या पैशाचा ठाव लागेना

नवी दिल्ली – देशात नेमका काळा पैसा आहे किती याचा अंदाज घेण्यासाठी २०११ साली नेमण्यात आलेल्या अभ्यास आयोगाने काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी बराच आटापिटा केला परंतु अजून तरी या देशात नेमका किती काळा पैसा आहे याचा अंदाज या आयोगाला आलेला नाही. अजूनही अभ्यास सुरू आहे. केंद्रीय अर्थखात्याने हा आयोग नेमला होता आणि त्यांना १८ महिन्याच्या आपला अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला होता. परंतु १८ महिन्याची ही मुदत गेल्या २१ ऑगस्टला संपलेली असूनही आयोगाचा अहवाल तयार झालेला नाही.

या आयोगामध्ये दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स ऍन्ड पॉलिसी, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च आणि हरियाणातील फरिदाबादची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिनान्शियल मॅनेजमेंट या तीन संस्थाचा समावेश करण्यात आलेला आहे. या आयोगाचे कामकाज कसे चाललेले आहे आणि त्याचे पुढे काय झाले. याचा काहीच पत्ता लागत नव्हता. म्हणून माहितीच्या अधिकाराखाली अर्थ खात्याकडे ही माहिती मागविण्यात आली तेव्हा वरील माहिती उघड झाली.

या आयोगाने काळ्या पैशाविषयी कोणती माहिती आजपर्यंत मिळविली आहे. हाही प्रश्‍न माहितीच्या अधिकाराखाली करण्यात आलेल्या अर्जात विचारण्यात आला होता. परंतु या कायद्यातील कलमांखाली ही माहिती देता येत नाही. असे अर्थखात्याने कळविले आहे. मात्र आपल्या देशातली काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था प्रचंड मोठी असल्याचे या आयोगाला आढळले आहे आणि अजूनही हा अभ्यास अर्धवट आहे. हे उघड झालेले आहे.