एडस विरोधी लस शोधण्यात यश

वॉशिंग्टन – अमेरिकेतल्या एका जीन थेरपी इन्स्टीट्यूट मध्ये एडस् प्रतिबंधक लस शोधण्यात आली असल्याचा दावा त्या संस्थेच्या संशोधकांनी केला आहे. ही लस शरीरातले एडस्ला कारणीभूत असलेले विषाणू पूर्णपणे निष्प्रभ करू शकते असे या संस्थेचे प्रमुख संशोधक लुई पिकर यांनी म्हटले आहे. या औषधाचा प्रयोग आधी माकडातल्या एका विशिष्ट प्रकारच्या रोगावर केला जात असून तो यशस्वी झाला आहे. माकडात एडस्सारखाच एक रोग होतो. तो एका आय व्ही सारख्या विषाणूंपासून होतो. तो एस आय व्ही नावाच्या विषाणूपासून होतो.

या विषाणुंवर ही लस गुणकारी ठरली आहे. नव्या लशीने शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे दिसून आले असून हीच क्षमता एचआयव्हीचा प्रभाव पूर्ण कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो असे वाटायला लागले आहे. या लशीच्या वापरात सायटो मेगालो व्हायरस वापरला जातो. त्याचा आणि एसआयव्हीचा संयोग करून त्यांचा वापर केला तर एडस्चे विषाणू नष्ट होतील असा विश्‍वास त्यांना वाटत आहे.

शरीरातल्या टी सेल्स या पेशी रोग प्रतिकारक शक्तीस कारणीभूत असतात आणि त्या नष्ट झाल्या की माणसाची प्रतिकारक शक्ती कमी होते. नवी लस या पेशींच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका वठवू शकतो. ही माहिती नेचर या विज्ञान विषयक नियतकालिकांत प्रसिद्ध झाली आहे.