
शरद पवार यांनी आ बैल मुझे मार या न्यायाने उगाच बसल्या बसल्या एक वाद ओढवून घेतला आहे. या वादात सत्य त्यांच्या बाजूने नाही. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे पण त्यांच्या काही फायली मुख्यमंत्र्यांकडे अडकल्या आहेत याचा त्यांना एवढा राग आला आहे की, त्यांनी काही संबंध नसताना मुख्यमंत्र्यांना रिंगणात घेतले. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विलासराव देशमुख यांची प्रशासनावर किती पकड होती याची आठवण काढली. विलासराव देशमुख यांच्यातल्या काही चांगल्या गुणांची वाखाणणी केली असल्यास त्यात काही वावगे नाही. पण विलासरावांचे गुणगान करताना उगाच पृथ्वीराज चव्हाणांंना टपली मारायचे काही कारण होते का ? पण त्यांनी अनुचितपणे त्या कार्यक्रमात विलासराव एखाद्या कागदावर कशी पटकन स्वाक्षरी करीत असत याचे वर्णन केले. ते ठीकच आहे पण, त्यांच्याशी आताच्या मुख्यमंत्र्यांशी तुलना करण्याची काही गरज होती का ? गरज नसताना पवारांनी चव्हाणांना टोमणा मारला. आताच्या नेत्यांचे कोणत्याही फायलीवर सही करताना हात थरथरतात अशी टीका त्यांनी केली. नेमकेपणाने सांगायचे झाले तर, यांचा हात सही करताना लकवा मारल्यासारखा होतो असे ते म्हणाले.
पवारांकडून ही अपेक्षा नव्हती. कारण यातून गुणाने नांदणार्या आघाडीत अंतराय निर्माण होतो. आघाडीतले नेते एकमेकांवर अशी टीका करायला लागले तर सर्वांचीच अप्रतिष्ठा होते. तरीही दोन पक्षांत कलगीतुरा सुरूच असतो. यात कोणाला तरी टोमणा मारणे सोपे असते पण त्या टोमण्याला प्रति टोमण्याने उत्तर मिळाले तर फजिती होण्याची पाळी येते. ती फजिती सहन करण्याची तयारी असेल तरच अशा सवाल जबाबात आणि जुगलबंदीच्या वाटेला जावे. म्हणूनच असेल कदाचित पण पवारांनी तशी ही संघर्षाची जबाबदारी अजित पवारांच्या अंगावर टाकली आहे. ते काहीही बोलतात आणि बोलूनही घेतात. त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. अप्रतिष्ठा झाली तरीही त्यांना काही वाटत नाही. स्वत: शरदराव मात्र आपल्या पक्षाच्या नेत्यांना अशा सवाल जबाबापासून परावृत्त करीत असतात. स्वत: मात्र तेवढा संयम पाळत नाहीत. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना फारच चिडून लकवा झाल्याचे म्हटले. याचा अर्थ पवारांच्या मनात मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीविषयी अगदी आतून प्रचंड चीड आहे.
ती या निमित्ताने व्यक्त झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण फार सावकाशीने काम करतात आणि कोणत्याही फायलीवर सही करताना ते प्रकरण कायदेशीर आहे की नाही याची खातरजमा करतात. त्यात बराच वेळ जातो. खरेच जातो की नाही हे माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांची प्रतिमा सावकाश काम करणारा मुख्यमंत्री अशी करण्यासाठी कॉंग्रेस मधील काही आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांनी तसा प्रचार सुरू केला आहे. हा विषय तसा काही फार नवा नाही. यावर बर्याचदा चर्चाही झाली आहे. आता तर मुख्यमंत्र्यांनी त्याला चोख उत्तरही दिले आहे. समोर आलेली फाईल कायदेशीर असू द्या, पटकन सही करतो असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ उघड आहे. सहीसाठी समोर येणारी फाईल भानगडीची असू नये एवढीच त्यांची अपेक्षा आहे. फायली अडकतात पण त्या सरळ नसतात, त्यात काही ना काही भानगड असते. अशा फायलींवर उगाच पटकन सही करणे योग्य नाही. तसे केल्याने कोणी वेगवान काम करण्याचे प्रमाणपत्र देणार नाही, देत नाही. तेव्हा घाईने सह्या करून अडचणीत कशाला यायचे ? मुख्यमंत्र्यांनी तसा खुलासा केलाही आहे. त्यांना विशेष करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आणल्या जाणार्या फायलींची दहशत वाटत असावी. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतेक मंत्री भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. त्यातले चार मंत्री तर बाहेर पडले आहेत.
बाकीच्या मंत्र्यांत स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री दाखवा म्हटल्यास मुख्यमंत्रीच काय पण स्वत: शरद पवारांचीही बोबडी वळेल. तेव्हा सह्या करताना झालेला लकवा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चारित्र्यामुळे झालेला आहे. राष्ट्रवादीचे मंत्रीच नाही तर आमदारही एका पेक्षा एक आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या एका हॉटेलात छुपा वेश्या व्यवसाय चालत असल्याची पोलिसांना खबर लागली. म्हणून त्यांनी त्या हॉटेलावर धाड टाकली असता त्यांना तिथे काही फोटो लावलेले दिसले. हे फोटो त्या हॉटेलाच्या उद्घाटन समारंभाचे होते आणि ते उद्घाटन आर. आर. पाटील यांनी केलेले होते. आपण धाड टाकायला आलेले हॉटेल आपल्याच खात्याच्या मंत्र्यांच्या हातून शुभारंभ करून सुरू झालेले आहे हे पाहून त्या पोलीस अधिकार्यांचे हात किती थरथरले असतील याचा अंदाजही न केलेला बरा. राष्ट्रवादी कॉंग्रेस मधला त्यातल्या त्यात सभ्य मंत्री कोणते असा प्रश्न विचारला तर अशा मंत्र्यांची यादी आराराबा या नावापुढे सरकत नाही. पण या एकमेव चारित्र्यवान मंत्र्याची ही कहाणी असेल तर बाकीच्या मंत्र्यांचे काय सांगावे ? आराराबांनी या उद्घाटनाचे निमंत्रण ताबडतोब स्वीकारले असणार म्हणून अशी अडचण आली. पण ते निमंत्रण स्वीकारण्या पूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमाणे खातरजमा केली असती तर ?