सोने साठा सांगण्यास केरळातील देवस्थानांचा विरोध

तिरूवनंतपुरम – रिझर्व्ह बँकेने केरळातील प्रसिद्ध देवस्थानांना त्यांच्याकडील सोने व दागिने जवाहिरांचा साठा किती आहे याची माहिती देण्यासाठी बजावलेल्या नोटीसांवर मंदिर ट्रस्ट तसेच अनेक हिंदू संघटनांनी विरोध दर्शविला असल्याचे समजते. गेल्या महिन्यात केरळातील प्रमुख मंदिरांकडे रिझर्व्ह बँकेने पत्रे पाठवून त्यांच्याजवळील सोने व दागिन्यांचा साठा कळविण्याचे आदेश दिले होते.

देशभरातील प्रमुख मंदिरांना असे आदेश दिले गेल्याचे रिझर्व्ह र्बंकेचे म्हणणे आहे. मात्र देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थाने केरळ राज्यात आहेत. आणि या देवस्थानांकडे अक्षरशः हजारो टन सोने आहे. पद्मनाभ स्वामी मंदिरातील संपत्ती असून पूर्णपणे मोजली गेलेली नाही. तसेच गुरूवायूर येथील मंदिराकडेही अशीच संपत्ती आहे. श्रावणकोर देवस्वामी बोर्डालाही रिझर्व्ह बँकेने पत्र रवाना केले असून या बोर्डाच्या अधिपत्याखाली भगवान अयप्पा सबरीमला मंदिराचे व्यवस्थापन आहे. येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

या मंदिरातील व्यवस्थापनाकडून रिझर्व्ह बँकेकडून पत्रे मिळाल्याचे सांगितले गेले आहे मात्र सल्लागारांशी विचार करून नंतरच त्याबाबत उत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले गेले आहे. रिझव्हॅ बँकेने या मंदिरातील सोने विकत घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.