एक चित्रपटसुद्धा एखाद्या कलाकाराचे नशीब कसे बदलवू शकतो, याची प्रचिती अभिनेता शक्ती कपुरची कन्या श्रद्धा कपुरला पाहिल्यावर येते. काही अपयशी चित्रपटानंतर आलेल्या श्रद्धाच्या आशिकी-२ या चित्रपटाने तिच्यासाठी जणू यशाचा राजमार्गच खुला करून दिला आहे. या एकट्या चित्रपटाच्या भांडवलावर बॉलिवूडमध्ये तिची मागणी एवढी वाढली आहे की, एका चित्रपटात तिने थेट प्रियंका चोप्राची जागा पटकावण्याची करामत केली आहे. हल्लीच तिग्मांशू धुलियाच्या आगामी मिलन टॉकीज चित्रपटासाठी श्रद्धाची निवड करण्यात आली असल्याचे समजते.
शहिद कपुर नायक असलेल्या या चित्रपटामध्ये सुरुवातीस प्रियंका प्रमुख भूमिकेत होती. मात्र आता तिथे श्रद्धा आली आहे. खरेतर या चित्रपटामुळे प्रियंका सुरुवातीस अतिशय खुशीत होती, पण त्यानंतर ती त्यामध्ये कमी रस दाखवू लागली. या चित्रपटासाठी आपल्याला विचारणा करण्यात आली होती, हे खरे असले तरी नंतर कथा वगैरेबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी कुणीच आले नाही, असा खुलासा प्रियंकाकडून केला जात असला तरी त्यामागचे कारण निराळेच आहे. बुलेट राजामध्ये सैफ अली खान आणि सोनाक्षी सिन्हा यांना पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र आणणार्या तिग्मांशूची आपल्या पुढच्या चित्रपटातही नवी जोडी सादर करण्याची योजना होती.
प्रियंका आणि शहिद याआधीही पडद्यावर एकत्र आलेले आहेत. बहुधा म्हणूनच त्याने नायिका बदलण्याचा निर्णय घेतला. खरेतर शहिदच्या आधी इमरान खान हा चित्रपट करणार होता, पण तो ऐनवेळी त्यातून बाहेर पडल्यानंतर शहिदची एंट्री झाली. आता त्यासोबत फ्रेश जोडी बनविण्यासाठी श्रद्धाला घेण्यात आले आहे.