मुंबई – कर्जफेडीसाठी एअर इंडियाने पेडर रोड भागातील चार फ्लॅट आणि गुरगांव येथील मोकळा प्लॉट विक्रीसाठी काढला असल्याचे वृत्त आहे. या विक्रीतून किमान ५५ कोटी रूपये मिळावेत अशी कंपनीची अपेक्षा असल्याचेही सांगण्यात आले आहे. कर्जफेडीस मदत व्हावी म्हणून यापूर्वी एअर इंडियाने त्यांची नरीमन पॉईंटवरील २२ मजली इमारत लीजवर देण्यासाठी दिलेल्या जाहिरातीस अल्प प्रतिसाद मिळाला होता. या इमारतीतील चार मजले स्टेट बँकेने लीजवर घेतले आहेत. मात्र सध्याच्या काळात भाडेदरात घट झाल्याने त्यातून अपेक्षित उत्पन्न एअर इंडियाला मिळू शकलेले नाही.
वर्तमानपत्रातून देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार कंपनी पेडर रोड या उच्चभ्रू वस्तीतील २१६० चौ.फूटाचे चार फ्लॅट तसेच गुरांव येथील ४५२० चौरस फुटाचा मोकळा प्लॉट विकणार आहे. हा व्यवहार इ ऑक्शन पद्धतीने केला जाणार असून त्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली गेली आहे. एअर इंडियाचा आपल्या मालमत्ता विक्रीतून १२०० कोटी रूपये मिळविण्याच्या प्रयत्नात असून त्यात कोलकाता व कोइमतूर येथील एअर इंडिया कॉलनीतील जागा, चेन्नईतील जमीन, हाँगकाँग आणि नैरोबी येथील अपार्टमेंटस यांचा समावेश आहे. या मालमत्तेची विक्री १६ मार्च २०१४ पर्यंत करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचेही समजते.