ढाका – मायक्रो फायनान्स क्षेत्रात क्रांती घडविल्याबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले बांगला देशचे अर्थतज्ञ मोहम्मद युनुस यांच्यावर फंडसचा गैरवापर करून कर सवलती मिळविल्याप्रकरणी बांग्ला देश सरकारने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशी स्त्रोतातून आलेल्या कमाईवर युनुस यांनी करात सूट मिळविली असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे.
या संबंधी बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गेल्या वर्षीच राष्ट्रीय महसूल विभागाला तपासणीचे आदेश दिले होते. त्याचा अहवाला महसूल विभागाने आत्ता सादर केला असल्याचे समजते.गेल्या वर्षीच्या २ ऑगस्टपासून मिळालेल्या परदेशी पैशांचा तपास महसूल विभागाने केला असून यनुस यांनी ग्रामीण बँक प्रमुख म्हणून शेवटच्या वर्षात जे व्यवहार केले ते तपासले गेले आहेत. युनुस यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतला गेल्याचेही समजते.
लोकसेवक म्हणून काम करताना युनुस यांनी परकीय मार्गाने आलेल्या पैशातून बेकायदेशीर कर सवलती घेतल्या असल्याचा सरकारचा आरोप आहे. ग्रामीण बँकेकडून ग्रामीण कल्याण कोषासाठी युनुस यांनी पैसे दिले आहेत. मात्र ग्रामीण बँक ही छोटी कर्जे देणारी बँक असून ती केवळ भूमिहीन लोकांनाच कर्ज देऊ शकते. त्यामुळे युनुस यांनी ग्रामीण बँक अध्यादेशाचे उल्लंघन केले आहे असाही त्यांच्यावर आरोप आहे.७३ वर्षी युनुस यांनी त्यांच्यावर केले गेलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.