जपान ऑलिंपिक्समध्ये लपाछपी खेळाच्या समावेशाची मागणी

टोकियो – अन्य दोन देशांना मागे सारत जपानने २०२० च्या ऑलिपिक स्पर्धा भरविण्याचा मान पटकावला आहे. मात्र या स्पर्धात याशरू हझाकी या ६४ वर्षीय प्राध्यापकांनी लपाछपीचा खेळही या स्पर्धात घेतला जावा अशी आगळी मागणी केली आहे. हा स्पर्धात्मक खेळ जपान ऑलींपिक्स मध्ये समाविष्ट करावा कारण हीच त्यासाठी योग्य संधी आहे असे त्यांचे म्हणणे आहे. हझाकी लपाछपी प्रमोशन कमिटीचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

हझाकी म्हणतात, वास्तविक खेळात कुणालाही भाग घेता आला पाहिजे. स्पर्धा भरविताना सर्वांनाच खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. त्यात वय, लिग, क्षमता अशा अडचणी असता कामा नयेत. सध्याचे खेळ म्हणजे तंत्र, कौशल्ये यांना प्राधान्य देणारे आहेत मात्र त्यांना खेळ म्हणणे योग्य ठरणार नाही. लपाछपी सारखा खेळ कुणीही खेळू शकतो. अगदी चार वर्षाच्या मुलापासून ते ८० वर्षाच्या आजोबांपर्यंत कुणीही या खेळाचा आनंद घेऊ शकतो. जपानमध्ये ऑलिंपिक स्पर्धा भरत आहेत व त्यात आपल्या आवडीच्या खेळाचा समावेश करण्याची ही चांगली संधी आहे. या खेळाचा समावेश केला गेला तर जपान एक दिवस या खेळात सुवर्ण पदकांची कमाई करेल असाही त्यांचा दावा आहे.