लखनौ – पश्चिम उत्तर प्रदेशाच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या जातीय दंगलीचे लोण आसपासच्या भागात पसरत आहे. सोमवारी संध्याकाळी शेजारच्या शामली आणि बागपत या दोन जिल्ह्यातसुध्दा तणावाचे वातावरण पसरलेले दिसते. मुजफ्फरनगरच्या ग्रामीण भागामध्ये काल सहा जणांच्या हत्या करण्यात आल्या. त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या या सर्वाधिक हिंसक जातीय दंगलीमध्ये मरणार्यांची संख्या ३७ झाली आहे.
मुजफ्फरनगर दंगल; मृतांची संख्या ३७
गुळाच्या व्यापारासाठी प्रसिध्द असलेल्या या शहरात गेल्या आठवड्यापासून जातीय दंगली सुरू असल्यामुळे १५० कोटी रुपयांचा व्यापार बुडला आहे. अजूनही रक्तपात सुरूच आहे. लष्कर तैनात केले असून आणि राखीव पोलिसांची कुमक वाढवलेली असूनही काल या जिल्ह्याच्या खटौली तालुक्यामध्ये माथेरी गावी दोघा दूध विक्रेत्यांची हत्या करण्यात आली. प्रक्षुब्ध जमावाने त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह शेजारच्या शेतात पुरले.
मिरापूर आणि मुजफ्फरनगर या शहरामध्ये मोटार सायकलवरून जाणार्या दोघां युवकांना जमावाने लक्ष्य केले आणि त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. दरम्यान राज्य राखीव पोलिसाच्या जवानांनी समाज विघातक शक्तींना आटोक्यात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली असून अनेक लोकांना अटक केली आहे. शामली आणि बागपत या दोन जिल्ह्यात काही ठिकाणी दोन जमातींच्या जमावामध्ये उघड उघड चकमकी सुरू झालेल्या आहेत.
