
पुणे, – एकशे बावीस वर्षापूर्वी पुण्यात घुमलेला गणेशोत्सवाच्या ढोलताशांचा दणदणाट अजूनही सुरुच आहे. यावर्षीचे वैशिष्ठ्य म्हणजे पुण्यात वाढलेली ढोलांची प्रचंड मोठी संख्या. यावर्षी गणेशोत्सवात पन्नास हजारापेक्षा अधिक ढोल सहभागी होणार आहेत. ढोल-ताशांचा कडकडाट, तुतारी व पारंपारिक वाद्यांचा निनाद, गणपती बाप्पा मोरया… अशा भक्तीमय वातावरणात शहरातील मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. बहुतेक प्रमुख मंडळाच्या सकाळी नऊ वाजल्यापासूनच मिरवणूका काढण्यात आल्या यामुळे मानाच्या पाच गणपतीसह श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक टृास्ट आणि अखिल मंडई मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारा पुर्वीच झाली.
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट- मानाचा पहिला गणपती असलेल्या या मंडळाच्या मिरवणुकीस सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी प्रारंभ झाला. श्री ची मूर्ती मुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात येणार आहे. कसबा मंदिरापासून वाजत-गाजत ही मिरवणूक निघाली. यात चौघडा, शिववर्धन ढोलपथक, प्रभात बँड ही पथके सहभागी झाले होते. श्रींची मिरवणुक बुधवार पेठ, जोगेश्वरी, रमणबाग, लक्ष्मी रस्ता, अप्पा बळवंत चौकामार्गे मिरवणूक मंडपात पोहचली. त्यानंतर औदुंबर मठाधिपती व्यंकटरमण दीक्षित यांच्या हस्ते सकाळी 11 वाजून 16 मिनिटांनी श्री ची प्रतिष्ठापना झाली. मिरवणुकीत गुलाल न उधळण्याची परंपरा यंदाही राखण्यात आली परतीच्या मार्गावर सर्मथ ढोलपथक मिरवणुकीत सहभागी झाले.
श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव- मानाचा दुसरा गणपती असलेल्या या मंडळाच्या मिरवणुकीस सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला. अश्वरथातून मोठया दिमाखात पारंपरिक पद्धतीने निघाली. मूर्तिकार द.म. गुळुंजकर यांच्या शनिवार पेठेतील घरापासून निघाली. या मिरवणुकीत सतीश अढाव यांचे नगारवादन, शिवमुद्रा व न्यू गंधर्व बॅण्ड मिरवणुकीत सहभागी झाले होते.. शनिवार पेठेतून कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता, जोगेश्वरी मंदिरामार्गे मिरवणूक सकाळी 11.30 वाजता मंडपात मचली. त्यानंतर लगेच विशाल गोखले यांच्या हस्ते श्री ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळ- मानाचा तिसरा गणपती असलेल्या या मंडळाची मिरवणुकीस सकाळी 9 वाजता प्रारंभ झाला, मुलांनी सजविलेल्या रथातून शितळादेवी मंदिरापासून या मिरवणुकीत नादब्रम्ह, शिवगर्जना, नगारा ही पथके वैशिष्ट्यपूर्ण वादन केले. गणपती चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर येथून मिरवणूक सिटी पोस्टातून मांडवात आली. त्यानंतर श्री ची प्राणप्रतिष्ठा उद्योजक ललित शिंगवी, आरती शिंगवी यांच्या हस्ते सकाळी 11.55 वाजता करण्यात आली.
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- मानाचा चौथा गणपती असलेल्या या मंडळाची मिरवणुकीस सकाळी साडेआठ वाजता टिळक पुतळ्यापासून निघाली. शनिपार चौक, नगरकर तालीम चौक येथून लक्ष्मी रस्त्यामार्गे मिरवणूक मंदिरात आली. गजलक्ष्मी ढोल हे एकमेव पथक मिरवणूकीत सहभागी झाले होते, मंडळाच्या मूर्तीला यंदा 25 वर्षे पूर्ण होत असल्याने दिमाखदार मिरवणूक काढ्ण्यात आली. त्यानंतर सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता श्री ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
केसरी वाडा गणेशोत्सव मंडळ- मानाच्या पाचवा गणपती असलेल्या या मंडळाची मिरवणूक सकाळी 9 वाजता केसरीवाड्यातून पारंपरिक वाद्यांच्या निनादात, मुलांनी सजलेल्या पालखीतून काढण्यात आली. मिरवणुकीत बिडवे बंधूचे नगारवादन आणि श्रीराम ढोलपथकाचा समावेश होता. रमणबाग चौकातून मिरवणूक पुन्हा मांडवाकडे आली. श्रीराम ढोल पथक, सनई चौघडा ही पथके मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यानंतर सकाळी 10 वाजता रोहित टिळक यांच्या हस्ते श्री ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
अखिल मंडई मंडळ – मुलांनी सजविलेल्या रथातून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी मिरवणूक निघाली, या मिरवणुकीमध्ये नगारा, न्यू गंधर्व बँड व ओंकार ढोल ताशा पथक सहभागी झाले होते.. श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता कॅन्सरतज्ज्ञ डॉ. रविंद्र कसबेकर यांच्या हस्ते झाली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती- श्रीमंत दगडूशेठ गणपती सकाळी 8 वाजता मुलांच्या रथातून मिरवणूक निघाली. मिरवणुकीत नगारा, प्रभात आणि दरबार बँड यांचा सहभाग होता. े. श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी डॉ. बालाजी तांबे यांच्या हस्ते करण्यात आली.

छायाचित्र १ – कसबा पेठ गणपती

छायाचित्र २ – गुरुजी तालीम