पुणे, – महाराष्ट्रात बस प्रवाशांची सुरक्षा वाढावी व उतारूंना तिकिटही लवकर मिळावे यासाठी राज्यातील प्रमुख एसटी स्थानकांवर ऑटोमटिक तिकिट व्हेन्डिग मशीन (एटीव्हीएम) लावण्याचा विचार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ करत आहे. महामंडळाचे संगणकीकरण करण्याचे धोरणातर्गंत या मशीन आगारावर लावण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यानी दिली.
प्रामुख्याने गर्दीच्या काळात, तिकिटासाठी रांगा लागल्या असताना या सुविधेचा लाभ प्रवाशांना होऊ शकतो. एसटीच्या कामकाजात सुधारणा व्हावी, प्रवाशांना सुरक्षित सेवा मिळावी यासाठी महामंडळ विविह योजना राबवीत आहे त्याचाच एक भाग म्हणून एटीव्हीएम मशीन लावण्याचा विचार महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर होत आहे. महामंडळाचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा आहे. या भावनेतून चालकाचे समुपदेशन, कर्मचार्यांचे आर्थिक व शारीरिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एसटीमध्ये महिलांशी होणार्या छेडखानीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाहकांना सूचना दिल्या आहेत. तसेच संवेदनशील ठरविण्यात आलेल्या राज्यातील 16 आगारांवर सीसीटीव्ही कॅमेर्याची व्यवस्था महामंडळ लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.