मुजफ्फरनगर दंगलीतील मृतांची संख्या 31 वर

मुजफ्फरनगर – उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगली प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या चार आमदारांसह काँग्रेसच्या एका माजी खासदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोनशे जणांना अटक केली असून, एक हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मुजफ्फरनगरमधील दंगलग्रस्त भागात सोमवारीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान या दंगलीतील मृत झालेल्यांची संख्या 31 पोहचल्याची माहिती राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली. या दंगलीमुळे चहूबाजूंनी टीका होत असलेल्या उत्तरप्रदेश सरकारने सहारनपूरचे डीआयजी डी.डी.मिश्रांसह काही पोलिस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. मुजफ्फरनगर सहारनपूरमध्ये येत असल्याने, सहारनपूरच्या डीआयजीला जबाबदार धरुन बदली करण्यात आली.

दंगलीमध्ये पुहूगाना, शाहूपूर, धारूआकालान या भागात शस्त्रांचा गैरवापर झाल्याने या भागातील शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. भाजप आमदार हुकूम सिंह, सुरेश राणा, भारतेंडु आणि संगीत सोम आणि काँग्रेसचे माजी खासदार हरेंद्र मलिक यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल बी.एल.जोशी यांनी या दंगली प्रकरणी केंद्र सरकारला अहवाल पाठवला आहे. या अहवालामध्ये अखिलेश सरकारला दोषी ठरवले आहे.