पंतप्रधानांची निरवानिरव

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी परदेश दौर्‍यावरून येताना पत्रकारांशी वार्तालाप केला आणि आपण यापुढे पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत असणार नाही असे सूचित केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणाला गती मिळण्याची शक्यता आहे. कारण कॉंग्रेस पक्षामध्ये पंतप्रधानांना आणखी एक टर्म मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अर्थात कॉंग्रेसच्या हातात सत्ता आली तर. परंतु मनमोहन सिंग तिसर्‍या टर्मला राजी नाहीत असे त्यांनी दाखवून दिले आहे. ती देताना त्यांनी राहुल गांधी हेच चांगले पंतप्रधान होऊ शकतील अशी ग्वाही दिली आहे आणि वेळ पडल्यास आपण त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम करू अशी तयारी त्यांनी दाखवली आहे. राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान होण्याचा फार गांभिर्याने विचार करत नाही असे अनेकवेळा म्हटले आहे. परंतु कॉंग्रेसचे नेते त्यांच्या मागे लागले आहेत. पंतप्रधान होण्याची त्यांची पात्रता आहे की नाही हा मुद्दा फार वेगळा आहे. परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांना गांधी घराण्याचे वारस आज हवा आहे. या घराण्याचा कोणीच उमेदवार नेता म्हणून समोर नसेल तर आपण निवडणुका जिंकू शकू की नाही याविषयी त्यांच्याच मनात संभ्रम आहे आणि त्यामुळे गांधी घराण्याचे नाव पुढे करून सत्ता काबीज करण्याचा त्यांचा डाव आहे.

तेव्हा राहुल गांधी यांनी कितीही नकार दिला तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना मते आकृष्ट करू शकणारा हा लोहचुंबक हवा आहे. त्याशिवाय त्यांना सत्ता मिळणार नाही. त्यामुळे राहुल गांधींची चर्चा सारखी व्हावी असा प्रयत्न कॉंग्रेसचे नेते गेल्या दहा वर्षापासून करत आहेत. सोनिया गांधी यांना मनमोहन सिंग पंतप्रधान हवे आहेत परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांना ते पंतप्रधान म्हणून अजिबात नको आहेत. केवळ सोनिया गांधींची मर्जी असल्यामुळेच कॉंग्रेसच्या नेत्यांनी मनमोहन सिंग यांना सहन केले आहे. एवढेच नव्हे तर २००८ साली आणि नंतर २०१२ साली मनमोहन सिंग यांना हटवण्यासाठी कॉंग्रेसमध्ये कुजबूज मोहीम सुरू झाली होती. मनमोहन सिंग यांना हटवावे आणि त्याठिकाणी राहुल गांधी यांना बसवावे, एखादी अन्नसुरक्षेसारखी लोकप्रिय घोषणा हवेत सोडून द्यावी अशा रितीने गांधी घराने अधिक लोकप्रिय घोषणा या दोन्हींच्या जोरावर निवडणुका जिंकाव्यात अशी मांडणी कॉंग्रेसच्या नेत्यांनी २००९ च्या निवडणुकीपूर्वीही केली होती आणि २०१४ च्या आधीसुध्दा ही मांडणी केली जात होती. परंतु डॉ. मनमोहन सिंग यांची मोजकेच बोलण्यामुळे मतदारांमध्ये जी प्रतिमा निर्माण झाली होती ती कॉंग्रेससाठी जमेची बाजू झाली होती. त्यामुळे सोनिया गांधी मनमोहन सिंग यांना हटवू शकल्या नाहीत.

नंतरच्या काळात नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचे नाव फारसे जोरकसपणे पुढे आले नाही. कारण लोक मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करायला लागले तर राहुल गांधी फार फिके पडतील याची कॉंग्रेसच्या नेत्यांनाच पूर्ण खात्री होती. त्यामुळे मोदींची हवा चालेपर्यंत राहुल गांधींच्या आघाडीवर शांतता पसरली होती. काल नरेंद्र मोदी हेच एक पाऊल मागे गेले आणि २०१७ सालपर्यंत गुजरातचीच सेवा करू असे म्हणाले. त्यांच्या या घोषणेने कॉंग्रेसच्या नेत्यांच्या जिवात जीव आला आणि मोदी जर मैदानात नसतील तर राहुल गांधींचे नाव आता पुढे करायला काही हरकत नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्याचाच एक भाग म्हणून मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी यांच्या नावाची अशी शिफारस केली आहे. कॉंग्रेसचे नेते गांधी घराण्याची अफाट स्तुती करताना कधीच थकत नाहीत. हा नियम मनमोहन सिंग यांन लागू आहे. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांना आदर्श पंतप्रधान म्हणून जाहीर करताना त्यांच्या हाताखालीसुध्दा काम करण्याची तयारी दाखवली. जी व्यक्ती दहा वर्षे पंतप्रधानपद भोगते ती दुसर्‍या पंतप्रधानाच्या हाताखाली सामान्य मंत्री म्हणून काम करू शकेल का? त्यामुळे पंतप्रधान पदाचा अवमान होत नाही का? ही गोष्ट मनमोहन सिंग यांच्या मनातसुध्दा आलेली नाही. पण मनमोहन सिंग आता अविचाराने बोलायला आणि वागायला लागले आहेत.

ते यापूर्वी कधीही वावदूकपणाने वागत नव्हते. परंतु आता त्यांनी हे पथ्य सोडलेले आहे आणि म्हणूनच आपण आता या पदाला फार न्याय देऊ शकणार नाही. याची त्यांनाच खात्री वाटायला लागली आहे. म्हणूनही असेल कदाचित पण त्यांनी अशी निवृत्तीची भाषा सुरू केली आहे. देशाच्या अर्थकारणावर त्यांची म्हणावी तशी पकड राहिलेली नाही. किंबहुना देशाला आर्थिक प्रगतीकडे नेण्याची कुवत त्यांच्यात कधी नव्हतीच. ती फक्त आता सिध्द व्हायला लागली आहे आणि दहा वर्षे फार न बोलता, मौन पाळून आपली छबी सांभाळली ती सांभाळणे त्यांना आता जमेनासे झाले आहे. रुपयाची किंमत घसरत आहे, परदेशी गुंतवणूक केवळ कमीच झाली आहे असे नाही तर ती नगण्य अशी झाली आहे. देशाच्या विकासाचा गाडा फार कौशल्याने हाकून पुढे नेण्याची क्षमता मनमोहन सिंग यांच्यात नाही हे त्यांनाच जाणवायला लागले आहे. म्हणून राहुल गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून स्वतःच्या निवृत्तीची भाषा त्यांनी सुरू केली आहे. संसदेत कधी बोलण्याची पाळी आलीच तर त्यांनी शेर शायरी सादर करून वेळ मारून नेली होती किंबहुना भाजपावर मातसुध्दा केली होती. परंतु कोळसा भ्रष्टाचार प्रकरणात मनमोहन सिंग उघडे पडले आहेत आणि मी काही फाईली राखत बसलेलो नाही या त्यांच्या उद्गारातून त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले आहे. पंतप्रधान फायली राखत बसलेले नसतात परंतु त्यांच्या हाताखाली ४० लाख कर्मचारी काम करत असतात. त्यांच्यावरची पकड ढिली झाली की फायली हरवत असतात. त्यांनी आपली पकड ढिली झाली असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांचा अंतरात्मा त्यांना निवृत्त व्हायला सांगत आहे.