नवी दिल्ली – उपचारांसाठी अमेरिकेला गेलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भारतात परतताच डिझेल, रॉकेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविले जाणार असल्याचे वरीष्ठ अधिकार्यांकडून समजते. डिझेल लिटरमागे ३ ते ५ रूपये, रॉकेल लिटरमागे २ रूपये तर एलपीजी गॅस सिलिंडरमागे ५० रूपये अशी ही वाढ असेल. या दरवाढीसंदर्भातला निर्णय कॅबिनेटसमोर येण्याअगोदर काँग्रेस कोअर ग्रपकडून घेतला जाणार असून हा राजकीय निर्णय असल्याचेही सांगितले जात आहे.
रूपयांत होत असलेल्या घरसणीमुळे इंधन आयात खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. तेल व वायू मंत्री वीरप्पा मोईली यांनी ३० ऑगस्ट रोजीच पंतप्रधानांना पत्र लिहून डिझेल, गॅस दरात तातडीने वाढ केली जावी अशी मागणी केली होती. दरवाढीचा हा निर्णय सप्टेंबरमध्येच घेणे भाग आहे कारण त्यानंतर दिल्लीसह पाच राज्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू होते आहे. त्यामुळे सोनिया गांधी आठवड्याभरात अमेरिकेतून परतल्यानंतर लगोलगच हा निर्णय घेतला जाईल असे खात्रीलायक वृत्त आहे.
रूपयांचे डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या दरामुळे तेल आयातीतील तूट १ लाख ८० हजार कोटींवर गेली आहे. शिवाय सरकारला स्वयंपाक इंधनासाठी ९७,५०० कोटी रूयपे अनुदान द्यावे लागते आहे. डिझेल लिटरला ३ रूपयांनी वाढल्यास १३,५६५ कोटी, सिलिंडर ५० रूपयांनी वाढल्यास २६०४ कोटी तर रॉकेल २ रूपयांनी वाढल्यास १०१४ कोटी असे एकूण ५०९२८ कोटी रूपयांनी ही तूट कमी होण्यास मदत होणार आहे असेही समजते.