लंडन – ब्रिटनमध्ये केंट शहरात गुरुवारी झालेल्या एका विचित्र अपघातात 100हून अधिक गाडयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आणि सुमारे 200 लोक जखमी झाले. केंटमधील न्यू शेपे या चार मार्गिका असलेल्या पुलावर गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. या अपघातामध्ये एक दोन नव्हे तर 100हून अधिक गाडया असल्याने, त्या एकमेकांवर आदळण्याची क्रिया दहा मिनिटे सुरू होती.
अपघातानंतर या पुलावर एकमेकांमध्ये अडकलेल्या गाडयांचा खच दिसत होता. त्यामध्ये लहान गाडयांबरोबरच मोठया ट्रकचाही समावेश होता. सकाळच्या वेळी पडलेल्या दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. मात्र, त्यामुळेच हा अपघात झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात प्रत्यक्ष पाहणा-याच्या मते धुके पडल्यानंतर फारच कमी अंतरावरचे दिसत असूनही बरेच वाहनचालक गाडीचे दिवे न लावता वाहन चालवत होते. या अपघातात सुमारे 200 लोकांना किरकोळ जखमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यापैकी सहा जण गंभीर असल्याची शक्यता आहे.