भारतीय लेखिकेची अफगाणिस्तानात हत्या

काबूल – भारतीय लेखिका सुष्मिता बॅनर्जी यांची अफगाणिस्तानातील त्यांच्या रहात्या घराबाहेर दहशतवाद्यांनी गोळया झाडून हत्या केली. बॅनर्जी (49) अफगाणिस्तानातील पाकतिका प्रांतात रहात होत्या. त्यांनी अफगाण उद्योगपती जानबाझ खान यांच्याशी लग्न केले होते. नुकत्याच त्या अफगाणिस्तानात आपल्या नव-याकडे परतल्या होत्या. सशस्त्र दहशतवादी त्यांच्या घरात घुसले. नव-यासह घरातील अन्य सदस्यांना दहशतवाद्यांनी बांधून ठेवले व बॅनर्जी यांना घराबाहेर आणून त्यांची गोळया झाडून हत्या केली.

दहशतवाद्यांनी एका धार्मिक शाळेजवळ बॅनर्जी यांचा मृतदेह टाकला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. सुष्मिता बॅनर्जी येथे सय्यद कामाला म्हणूनही ओळखल्या जात होत्या. पाकतिका प्रांतात त्या आरोग्यसेविका म्हणून काम करत होत्या. कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 1995 साली त्या तालिबानच्या तावडीतून निसटल्या होत्या. या अनुभवावर त्यांनी काबुलीवालार बंगाली बोऊ हे पुस्तक लिहीले. या पुस्तकाची भारतात मोठया प्रमाणावर विक्री झाली. 2003 मध्ये या पुस्तकावर आधारीत एस्केप फॉर्म तालिबान या चित्रपटाचीही निर्मिती झाली.