द. कोरिया – स्मार्टफोनच्या एका क्लिकवर आपोआप पार्क होणारी आणि पार्क होताना स्वत:चा आकार कमी करणारी आर्माडिलो टी ही कार कोरियन संशोधकांनी तयार केली आहे. आर्माडिलो या प्राण्याच्या कवचाप्रमाणे ही कार दिसत असल्याने तिला या प्राण्याचेच नांव दिले गेले आहे.
गर्दीच्या शहरात जेथे पार्किंगसाठी जागा नसते अशा ठिकाणी म्हणजे चौकात, इमारतीच्या कोपर्यात, मॉल, सुपरमार्केट अशा ठिकाणी ही दोन सीटर कार अतिशय उपयुक्त आहे असे कार बनविणारे शूइन सू यांचे म्हणणे आहे. सू कोरियन अॅडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये प्रोफेसर आहेत. अर्थात या कारचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन होऊ शकणार नाही कारण सुरक्षेचे कांही नॉर्म या कारमध्ये उपलब्ध नाहीत असे सांगून सू म्हणाले की सध्या पर्यावरणपूरक वाहने बनविण्याचा जो ट्रेंड आहे त्याचा एक भाग म्हणून ही कार बनविली गेली आहे.
इलेक्ट्रीकवर चालणारी ही कार 10 मिनिटंाच्या चार्जवर 100 किमीचे अंतर कापू शकणार आहे. तिचा वेग ताशी 60 किमी कमाल इतका आहे. पार्क करताना स्मार्टफोनच्या सहाय्याने ती पार्क होईल व पार्क होताना तिचा आकार कमी होऊन ती केवळ 65 इंचाची होते. कारचा आकार सुटसुटीत रहावा यासाठी साईड मिरर ऐवजी कारच्या डॅशबोर्डावरच छोटे कॅेमेरे लावले गेले आहेत.