पेस-स्टेपनेकची सेमीफायनलमध्ये धडक

न्युयार्क- अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅममध्ये भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेस आणि त्याचा साथीदार रॅडेक स्टेपनेक या जोडीने उपांत्य फेरीत धडक मारली. पेस-स्टेपनेक जोडीने एसाम ऊल कुरेशी (पाकिस्तान) व ज्युलियन रॉजर (हॉलंड) या जोडीवर रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. गतविजेता ऍण्डी मरे, नंबर वन सीडेड नोवाक जोकोविच, मिखेल योजनी आणि स्टॅनिस्लास वावरिंका यांनी पुरुषांच्या एकेरीत विजयी घोडदौड केली.

पेस व स्टेपनेक यांनी मंगळवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत कुरेशी व रॉजर या जोडीचे आव्हान ६-१, ६-७, ६-४ असे तीन सेटमध्ये परतवून लावले. ही लढत जवळपास अडीच तास रंगली. आता पेस-स्टेपनेक जोडीसमोर पुढील फेरीत माईक व बॉब या ब्रायन बंधूंचे आव्हान असणार आहे.

गतविजेता ऍण्डी मरे, नंबर वन सीडेड नोवाक जोकोविच, मिखेल योजनी आणि स्टॅनिस्लास वावरिंका यांनी पुरुषांच्या एकेरीत घोडदौड केली. मरेने डेनिस इस्तोमिनवर चार सेटमध्ये विजय मिळवला, तर जोकोविचला मार्सेल ग्रॅनोलर्सविरुद्ध यश मिळाले. सेरेना विल्यम्स आणि पाचवी सीडेड ना ली यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सेरेनाने १८ व्या सीडेड कार्ला स्वारेझचा ६-०, ६-० असा फडशा पाडला. दुसरीकडे ना लीने एकतेरीना मॅकारोवाची कडवी झुंज ६-४, ६-७, ६-२ अशी मोडून काढली.