मुंबईतील ‘त्या’ नराधमांविरूध्द आणखी एका तरुणीची तक्रार

मुंबई- मुंबईतील शक्ती मिल कपाऊंडमध्ये वृत्तछायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणा-या नराधमांच्या वासनेची बळी ठरलेली आणखी एक तरुणी पुढे आली आहे. या नराधमांनी ३१ जुलैला या तरुणीवर बलात्कार केला होता. मंगळवारी सकाळी भांडूप पोलिस ठाण्यात या तरुणीने तक्रार दाखल केली. या पाच आरोपींपैकी तीन जणांना संबंधित तरुणीने ओळखले आहे.

पाच नराधमांनी ३१ जुलै २०१३ ला १९ वर्षांच्या तरुणीवर त्याच ठिकाणी बलात्कार केला. संबंधित तरुणी आपल्या एका मित्रासोबत महालक्ष्मी परिसरात आली होती. वेळ वाचविण्यासाठी ती शक्ती मिल कपाऊंडमधील मार्गाने जाऊ लागली. त्यावेळी या पाच नराधमांनी तिला निर्जनस्थळी ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरून गेल्यामुळे संबंधित तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. मुंबई पोलिसांनी संबंधित तरुणीच्या तक्रारीचा तपासही गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केला आहे.

मुंबईत २२ ऑगस्ट रोजी शक्ती मिल कपाऊंड परिसरात पाच नराधमांनी एका वृत्तछायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी पाच नराधमांपैकी चौघांना मुंबईतून तर एकाला दिल्लीतून अटक केली. या पाच जणांनी दिलेल्या कबुलीतून त्यांनी याआधी शक्ती मिल कपाऊंडमध्ये दोन महिलांवर बलात्कार केल्याची म्हटले होते.