एसटीची 120 कोटी रु संकलनाची मोहीम

पुणे, – डिझेलची वारंवार झालेली दरवाढ आणि नुकत्याच झालेल्या कामगार करारामुळे एसटी महामंडळ . आर्थिक संकटावर अडचणीत आले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी एस टी महामंडळाने चार महिन्यांत तब्बल 120 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात राज्यातील सर्व विभाग नियंत्रक आणि प्रादेशिक व्यवस्थापकांची बैठक नुकतीच झाली. त्यात पुढील चार महिन्यांत 120 कोटी रुपये उत्पन्न स्वबळावर वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.

या बैठकीत दीपक कपूर यांनी राज्यातील सर्व मार्गांची तपासणी करून समांतर वाहतुकीचे सुसूत्रीकरण करणे, प्रवाशांच्या मागणीनुसार सेवेत योग्य बदल करून भारमान वाढविण्याबाबत कार्यवाही करणे, नुकतीच मोठया प्रमाणात भरती केल्यामुळे चालक आणि वाहकांची कमतरता संपुष्टात आली असून, या कर्मचार्यांचा योग्य रितीने वापर करून अतिकालिक भत्त्याचे प्रमाण कमी करणे, सध्याच्या 58.7 टक्के भारमानात कमीतकमी 1.8 टक्के वाढ करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करून डिसेंबर 2013पर्यंत 60.5 टक्के भारमानाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आदेश एसटीच्या सर्व अधिकार्यांना दिले आहेत.