रितेश काढतोय खाशाबांवर चित्रपट

भारताचे पहिले ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यावर ’पॉकेट डायनॉमो’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून, हा चित्रपट क्रीडालेखक संजय दुधाणे यांच्या ‘ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकावर आधारित असणार आहे, अशी माहिती ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव विकास संस्थेचे अध्यक्ष रणजीत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अभिनेता रितेश देशमुख यांच्या मुंबई फील्मकंपनीद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. पटकथा वाई येथील तेजपाल वाघ यांनी लिहिली आहे. रितेश देशमुख यांनी कराडमधील नियोजित खाशाबा जाधव कुस्ती संकुलातील प्रदर्शन हॉलमध्ये कायमस्वरूपी खाशाबा जाधव संग्रहालय उभारणीचा सर्व खर्च करण्याची तयारी दर्शिवली आहे.

संजय दुधाणे यांनी लिहिलेल्या खाशाबा जाधव यांच्यावरील पुस्तकाचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 2001 मध्ये प्रकाशन झाले होते. योगायोग म्हणजे त्यांचाच मुलगा रितेश देशमुख या पुस्तकावर आधारित चित्रपटाची निर्मिती करीत आहे. या चित्रपटाची निर्मिती हिंदी आणि मराठी भाषेत होणार आहे. चित्रपटात युवा खाशाबांची भूमिका खाशाबांचा नातू अमरजीत जाधव साकारणार आहे. हिंदी अनुवाद पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख गजानन चव्हाण यांनी तर इंग्रजी अनुवाद वरिष्ठ पत्रकार माधव गोखले यांनी केला आहे.

Leave a Comment