पुणे,- भगवे ध्वज… ढोलचा नाद…, ताशाचा कडकडाट…. आणि तालसम्राट आनंदम शिवमणीचे बहारदार ड्रमवादन अशा तालमय वातावरणाने पुणेकर भारावून गेले. ढोल आणि शिवमणीचे वादन याची अनोखी जुगलबंदी याने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला आणि पुणेकरांनी एक विक्रम गिनिज बुक ऑम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला.
गणेशोत्सव म्हटले की ढोल(महामृदंग) ताशा पथकांचा जल्लोष आपल्या नजरे समोर येतो. श्रींचे आगमन अवघे काही दिवसावर आले आहे यामुळे या पथकांचा सराव जोमात सुरू आहे. पुणेकरांची ओळख बनलेल्या या ढोल पथकांचे संचलन पहाण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून गणेशभक्त शहरात येतात शनिवारी या ढोल पथकांनी पुण्याचे नाव जागतिक पातळीवर नेले. निमित्त होते स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंती वर्षाचे.
ढोल-ताशा महासंघ, पुणेतर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. स्वामी विवेकानंदांना जोशपूर्ण वादनातून अभिवादन करण्याकरिता चार हजार 212 ढोल वादकांनी यात सहभाग घेतला त्यांनी सलग 22 मिनिटे वादन करून हा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी कोल्हापुरकरांच्या नावावर 1 हजार 350 वादक आणि साडे सात मिनिटे असा रेकॉर्ड होता. पुणे शहरातील 70 पिंपरी चिंचवड मधील 25 पथके यात सहभागी झाली होती. याशिवाय कोळवणच्या खोर्यातून, तळेगाव येथून आणि कल्याण येथूनही एक पथक सहभागी झाले होते. ढोल पथकांच्या वादनानंतर शिवमणी आणि ढोल पथक यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले यानंतर शिवमणी यांच्या ड्रम वादनाने रसिकांची मने जिंकली.
मोटो ओळ – स.प. महाविद्यालय, स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ढोल ताशा महासंघाच्या वतीने त्यांना विक्रमी अभिवादन करण्यात आले. 4 हजाराहून अधिक ढोल वादकांनी सलग 22 मिनिटे ढोल वाजवुन त्यांना अभिवादन केले याची नोंद गिनिज बुक ऑम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.