राज्यातून पाऊस गायब

पुणे, – राज्यातील कोकण – गोवा आणि मध्यमहाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी आज पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तर गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातून पाऊस गायब झाला आहे. राज्यात आज दिवसभरात सर्वाधिक पाऊस नाशिक येथे केवळ 5 मिमी नोंदवला गेला.

पूर्व उत्तर प्रदेश व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व उत्तर प्रदेश व लगतच्या बिहारच्या भागावर आहे. समुद्रसपाटीवर असलेला मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा त्याच्या सामान्य स्थितीच्या तुलनेत जवळपास आहे. गेल्या 24 तासात कोकण – गोवा आणि मध्यमहाराष्ट्रातील इगतपुरी, गगनबावडा सोडला तर तर अन्य शहरातून पाऊस गायब झाला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातून गेल्या दोन पाऊस गायब झाला आहे. पुढील 48 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुणे शहरात गेल्या आठ दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसभरात पावसाचा एक – दोन हलक्या सरी पडत्यात. आज दिवसभरात पावसाची एकच सरी पडली. पुढील 24 तासांत शहरात पावसाच्या एक-दोन हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्गही बंद आहे. आज दिवसभरात धरणक्षेत्रात पावसाच्या दोन – तीन हलक्या सरी पडल्या. राज्यात आज दिवसभरात नाशिक 5, महाबळेश्वर येथे 0.2, मुंबई आणि डहाणू येथे प्रत्येकी 1 मिमी पावसाची नोंद झाली.
—————————–