मुंबई – मुंबई गँगरेप प्रकरणातला पाचपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या आरोपीच्या भावाने दिलेल्या शाळेच्या दाखल्याच्या आधारे या आरोपीला जुवेनाईल कोर्टात सादर करण्यात आले. त्या नंतर हा निणर्य घेण्यात आला.
शक्ती मील कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्टला संध्याकाळी मुंबईत महिला फोटोग्राफऱवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींची स्केच जारी करुन आरोपींना अटक केली.या पाचही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली.
यामधील एका आरोपीचे खरे वय ठरवण्यासाठी हाडांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या नातलगांनी सादर केलेल्या जन्मदाखल्याची शहानिशा पालिका अधिकारी करत आहेत. त्याच्या नातलगांनी नायर हॉस्पिटलचा दाखला दिला असून त्यामध्ये त्याचे वय १६ वर्ष ६ महिने दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता वैद्यकीय तपासणीवरच पोलिसांच्या आशा अवलंबून आहेत.
हे पुरावे त्याच्याविरुद्ध गेल्यास त्याची अन्य आरोपींसोबत चौकशी आणि त्यांच्याइतकीच शिक्षा होऊ शकेल. याबाबत पोलीस आशावादी असले, तरी सध्याच्या स्थितीत हा आरोपी सुटण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.