‘सीसीटीव्ही’साठी मंडळांनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

पुणे, – यावेळी गणेशोत्वाचा आनंद लुटता यावा म्हणून रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे पण गणेशोत्सवात काही गडबड होवू नये म्हणून अधिकाधिक मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शासनाच्या सीसीटीव्हीसाठीच्या निविदा प्रक्रियेस विलंब होणे ही दुर्दैवी बाब आहे. परंतु, शासनाकडून कोणतीही अपेक्षा न करता काही गणेश मंडळांनी दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन अन्य मंडळांनीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी गणेश मंडळांना केले. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण गणेश कला क्रीडा मंच येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडून त्याचे पावित्र्य राखण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत पवार म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात महिलांसह सर्व नागरिकांना मद्यपींकडून होणारा त्रास लक्षात घेऊन आणि हा उत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी दि. 9, 18 आणि 19 सप्टेंबरला शहरातील दारू विक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे पवार यांनी संगितले.

पवार म्हणाले, गणेशोत्सवामध्ये ध्वनी मर्यादा, कमानींची उंची, जाहिरातीवरील निर्बंध आणि विसर्जन मिरवणुकीतील वेळ कमी करण्यासारख्या मुद्द्यांबाबत पोलीस व मंडळांनी समन्वय ठेवावा. परिमंंडळ एकचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.मिलिंद भोई यांनी पुरस्कारार्थी मंडळांची नावे जाहीर केली. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.