मॉस्को- अमेरिका -रशिया यांच्यात सिरिया प्रश्नी संघर्षाची शक्यता आहे. त्यामुळे जग पुन्हा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. सिरियावर लष्करी कारवाई कराल, तर परिणाम वाईट होतील, असा इशारा सोमवारी रशियाकडून अमेरिकेला देण्यात आला.
सिरिया प्रश्नी अमेरिका – रशिया यांच्यात संघर्ष?
अमेरिका आणि रशियातील शाब्दिक लढाईला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांचे वक्तव्य कारणीभूत ठरले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जिइ लाव्हरोव्ह यांनी केरी यांना कारवाई करण्याचा विचार करू नका, असे बजावले आहे. लाव्हरोव्ह यांनी रविवारी केरी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्या संभाषणात लाव्हरोव्ह यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचा नेमका तपशील समजू शकला नसला तरी रशियाकडून तीव्र नाराजी व्यक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिरियातील हिंसाचार थांबवण्यासाठी अमेरिकेने अंतर्गत पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यावर रशियाने आक्षेप घेतला आहे. अशा कारवाई गरज नसल्याचे लाव्हरोव्ह यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे दमास्कसवर दबाव वाढवणे गैर आहे. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असा दावा रशियाने या संभाषणातून केला.
दरम्यान, सिरियातील हिंसाचार थांबणार नसेल तर संयुक्त राष्ट्राचा पाठिंब्याशिवाय देखील लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या ब्रिटनने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री विल्यम हॉग यांनी हे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने या मुद्द्यावर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कोइस ऑलंद यांच्याशी चर्चा केली.
