आसाराम बापूंना फासावर लटकवण्याची मागणी

जोधपूर – आसाराम बापू यांच्याकडून आपल्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. या घटनेबद्दल घरी सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला उद्धस्त करण्याची धमकी बापूंनी दिल्याचे ते म्हणाले. शिवाय त्यांच्या शिष्यांकडून केस मागे घेण्याबाबत आपल्यावर दबाव येत असल्याचेही पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. आसाराम बापूंना अजूनपर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले संत आसाराम बापू यांना लुकआऊट’ नोटीस जारी करण्याची लेखी मागणी जोधपूर पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडे केलीय. ही मागणी मंजूर झाल्यास आसाराम यांना देश सोडून अन्यत्र जाता येणार नाही. पोलिसांनी आज आठ तासांच्या प्रतिक्षेनंतर इंदूरच्या आश्रमात चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होण्याचे समन्स बापूंना बजावले आहे.

आसाराम बापू यांच्यावरील आरोपांची शहानिशा होईपर्यंत त्यांना देश सोडून बाहेर जाता येऊ नये, यासाठी लुकआऊट नोटीस’ जारी करावी असे निवेदन जोधपूर पोलिसांनी दिल्लीच्या सह इमिगे्रशन संचालकांना पाठविले आहे. आसाराम यांनी 30 ऑगस्टला चौकशीसाठी जोधपूर पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश आहे.