पुणे, – एकेकाळी ‘टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं हाच खरा प्रश्न आहे’.. या संवादाने ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी ‘नटसम्राट’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमी गाजवली होती. आज याच नवीन संचातील नाटकाने विश्वविक्रम केला आहे.
‘नटसम्राट’ची गिनीज बुकसाठी विश्वविक्रमी कामगिरी
नटसम्राटची मुख्य भूमिका केलेले गिरीष देशपांडे यांनी सलग 31 तास 45 मि. आठ नाट्य प्रयोग करून या नाटकाचा विश्वविक्रम केला आहे. लवकरच या विक्रमाची ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होणार आहे. त्यामुळे आता सलग आठ प्रयोग करून अमेरिकेतील सेव्हन ओ क्लॉक नाटयसंस्थेच्या नावावर असलेला 23 तास 30 मिनिटे आणि 54 सेकंदांचा विक्रम मोडून मराठी रंगभूमीच्या नावावर या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.
तीर्थराज, रंगमैत्री, दादा कोंडके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नटसम्राट नाटकाच्या सलग आठ प्रयोगांना मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरुवात झाली. सकाळी पावणेसहा वाजता या उपक्रमातील पहिल्या प्रयोगासाठी पडदा वर गेला. तेव्हापासून आज (बुधवार) सकाळी साडे बारा वाजता या नाटकाचा आठवा प्रयोग ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या उपस्थित झाला. नाटकामधील प्रमुख पात्र असलेले आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका गिरीश देशपांडे तर कावेरीची भूमिका मुक्ता पटवर्धन यांनी केली. इतर भूमिकेत पराग बर्वे, केतन लुंकड, सायली जाधव, श्रुती पारकर, नंदाची गौरव देशपांडे, अश्विन मिसाळ, सोनल गोडबोले हे आहेत.
या विक्रमाबाबत बोलताना देशपांडे म्हणाले, या विक्रमाद्वारे मराठी नाटकाला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न होता. प्रयोग संपेपर्यत ‘टू बी ऑर नॉट टू बी’ च्याच मनस्थितीत आम्ही होतो. परंतु, रात्री दोनचा प्रयोगही हाऊसफूल झाला आणि रंगभूमीचा आशिर्वाद मिळाला असे वाटले. सहाव्या प्रयोगापर्यंत छातीत दुखायला आणि घसा खवखवायला लागला होता. भूमिकेतून सारखं आत-बाहेर होण खूप अवघड होत. पण प्रेक्षकांच्या टाळ्या हेच आमचे ‘ऑक्सिजन’ झाले, असा भावस्पर्शी अनुभव देशपांडे यांनी सांगितला. तर कावेरीची भूमिका करणार्या मुक्ता पटवर्धन यांनी नाटकाचा अनुभव अवर्णनीय असल्याचे सांगत प्रेक्षकांचे आभार मानले.
ही सर्वोत्कृष्ट कामगीरी- डॉ. लागू
‘सलग 31 तास 45 मिनिट नाटकाचे आठ प्रयोग करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या काळी मी दोन प्रयोग केले तरी मला दमायला व्हायचे. नटसम्राट नाटकासाठी खूप ताकद लागते. सलग नाटकाचा प्रयोग म्हणजे सर्वोत्कृष्ट कामगीरी आहे.’
