आसाराम बापू समर्थकांविरोधात गुन्हा

नांदेड – नांदेडमध्ये सोमवारी आसाराम बापू समर्थकांनी माध्यमांविरोधातच मोर्चा काढला होता. या मोर्चेक-यांनी प्रसारमाध्यमांविरोधात शिवीगाळ करत टीका केली. आसाराम बापूंच्या समर्थकांनी पोलिसांच्याच समक्ष वार्ताकनासाठी हजर असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आसाराम समर्थकांविरोधात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुष्काळात पाण्याची नासाडी, गुरुकुलात विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू अन् आता एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाची बाब त्यांच्या बाबतीत पुढे आली आहे. प्रसारमाध्यमांनी आसाराम बापूंच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे वृत्त प्रसारित केले. पण कदाचित आसाराम समर्थकांना ते भावले नाही. त्यामुळे समर्थकांनी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांविरोधात मोर्चा काढला.

मोर्चानंतर जाहीर भाषण करताना आसाराम समर्थकांनी सभ्यतेचे सर्व संकेत पायदळी तुडवले. पत्रकारांनी हा निषेध मोर्चा संपल्यानंतर समर्थकांनी सुसंकृत भाषेत बोलणे अपेक्षित होते, असे म्हणताच समर्थक खवळले. त्यांनी सराईत गुंडांप्रमाणे उपस्थित असलेल्या पत्रकारांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या समक्ष पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पत्रकारांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली.