ते नराधम माझे कार्यकर्ते नाहीत-सचिन आहिर

मुंबई – शक्ति मिल कंपाऊंडमधील बलात्कार प्रकरणातील तीन नराधम माझे कार्यकर्ते नसून वृत्तपत्राने प्रसिध्द केलेल्या छायाचित्रातील व्यक्ती हे बलात्कार प्रकरणातील आरोपीदेखील नाहीत असे स्पष्टीकरण गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहिर यांनी दिले आहे. केवळ माझी वैयक्ती क बदनामी करण्यासाठी भाजपने हे कृत्य केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि संबंधीत वृत्तपत्र या सर्वांवर अब्रु नुकसानीचा दावा करणार असून भाजपने गंभीर प्रकरणावरुन असे घाणेरडे राजकारण करणे थांबवावे असेही त्यांनी सांगितले.

बलात्कार प्रकरणातील तीन नराधम गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहिर यांचे कार्यकर्ते असल्याचे वृत्त काही हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांनी मंगळवारी प्रसिध्द केले होते. या वृत्तात सचिन आहिर यांचा तिघे जण सत्कार करतानाचे फोटो प्रसिध्द करण्यात आले होते. हे तिघे जण बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचा दावा करण्यात आला होता. २०१० मध्ये ईद-ए-मिलादच्या वेळी काढलेले हे छायाचित्र होते. या वृत्तामुळे सचिन आहिर हे वादाच्या भोव-यात सापडले होते.

या पार्श्वभूमीवर सचिन आहिर यांनी पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. हे छायाचित्र खोटे असल्याचा दावा त्यांनी पुराव्यासह केला आहे. छायाचित्रातील तिघे जण धारावीतील सामान्य रहिवासी असून त्यांचा या बलात्कार प्रकरणातील आरोपींशी काहीही संबंध नाही असे सांगत त्यांनी या तिघांना पत्रकारांसमोर हजर केले. वृत्तपत्राच्या चुकीच्या वृत्तामुळे या तिघांची समाजात नाहक बदनामी झाली असेही त्यांनी नमूद केले. मुंबई क्राईम ब्रँचचे जॉईंट सीपी हिंमाशू रॉय यांनीदेखील हा फोटो बोगस असल्याचे स्पष्ट केल्याचे आहिर यांनी सांगितले.

Leave a Comment