सोनिया गांधींना एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

नवी दिल्ली– काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) हॉस्पिटलमधून मंगळवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी रात्री लोकसभेत अन्न सुरक्षा विधेयकावर चर्चा सुरु असताना, अचानक सोनिया यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर पाच तासांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

त्यांची प्रकृती आता उत्तम आहे असे काँग्रेसचे सरचिटणीस जर्नादन दिवेदी यांनी सांगितले. सोनिया गांधी यांना सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. यासाठी सोनिया औषधे घेऊन सभागृहात आल्या होत्या. या औषधांमुळे सोनियांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. म्हणून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनियांना जो त्रास होत होता त्या आजाराच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून, त्या सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य आले आहेत असे एम्समधील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

सोमवारी रात्री दहाच्या सुमारास सोनियांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना राहुल गांधी आणि कुमारी शैलजा यांनी सभागृहाबाहेर आणले. त्यानंतर तातडीने एम्स रुग्णालयात दाखल केले. सोनिया गांधी यांना सुरुवातीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.