उत्तर प्रदेशात विहिंपचा कायदेभंग

फैजाबाद – उत्तर प्रदेश सरकारने विश्‍व हिंदू परिषदेच्या अयोध्येकडे जाणार्‍या ८४ कोसी राम यात्रेला परवानगी नाकारली असली तरीही परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या बंदीची तमा न बाळगता आपली ही यात्रा काढण्याचा निर्धार केला असून या यात्रेच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी बंदी आदेश झुगारून पूर्व तयारीची बैठक घेतली आहे. हे ठिकाण बस्ती जिल्ह्यात माखोरा हे असून ते अयोध्येपासून १५ किलो मीटर अंंतरावर आहे. त्यामुळे अयोध्येच्या परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

ही ८४ कोसी परिक्रमा ज्या सहा जिल्ह्यातून जाणार आहे त्या सहा जिल्ह्यात सरकारने बंदी आदेश जारी केला असून विश्‍व हिंदू परिषदेच्या बैठकांना बंदी केली आहे. पण काल भाजपा आणि विहिंपच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांनी माखोरा येथे बैठक घेतली. या बैठकीत सरकारचा आदेश झुगारून परिक्रमा करण्याचा निर्धार करण्यात आला. या परिक्रमेत १० हजार कार्यकर्ते सामील होतील अशी माहिती विहिंपच्या सूत्रांनी दिली. या परिक्रमा मार्गावरच्या गावात काही लोक परिक्रमा करणारांना आश्रय देतील. असा आश्रय देणार्‍या सरपंचांना आपले पद गमवावेे लागेल असा इशारा त्या त्या तहसीलदारांनी दिला आहे.

या भागाचे पोलीस उप महानिरीक्षक अरुण कुमार यांनी या भागातल्या कायदा सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेतला आणि कायदा मोडणारांवर कठोर कारवाई केली जाईल असे बजावले. अयोध्येच्या पाच ते दहा किलोमीटरच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.