नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळ प्रत्यक्ष कर विषयक डायरेक्ट टॅक्स कोड बिल २०१३ हे विधेयक मंजूर करण्याच्या विचारात असून त्यामध्ये अतिश्रीमंत लोकांवर आयकराशिवाय ३५ टक्के अधिभार लावण्याची तरतूद आहे. आयकराच्या विविध स्लॅबनुसार या लोकांवर आयकर तर लावला जाईलच शिवाय मालमत्ता करही लागू असेल. अलीकडच्या काळात अशा अतिश्रीमंत लोकांच्या जवळील भारी घड्याळे आणि त्यांच्या घरात लावली जाणारी किमती पेंटिंग्ज् यांच्यावर असलेला कर सुरूच राहणार आहे.
हे विधेयक आधी केंद्रीय मंत्रिमंडळ मंजूर करील आणि नंतर ते संसदेत मंजूर करून घेतले जाईल. त्यामध्ये अतिश्रीमंत कोणाला म्हणावे याची निश्चित व्याख्या करून किती उत्पन्नानंतर त्यांना अतिश्रीमंत म्हणावे हे ठरवले जाईल. सध्या आयकराचे तीन स्लॅब आहेत. त्याशिवाय हा सरचार्ज असेल आणि तो चौथ्या स्लॅबच्या स्वरूपात लावला जाईल.
सध्या दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणार्यांना आयकर लागत नाही. २ ते ५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणार्यांना १० टक्के आयकर लावला जातो. ५ ते १० लाख उत्पन्न असणार्यांना २० टक्के आणि १० लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणार्यांना ३० टक्के आयकर लावला जातो. आता हा चौथा स्लॅब लागू करताना आणि ३५ टक्के अधिभार लावताना आधीच्या तीन स्लॅब मध्येसुध्दा बदल होण्याची शक्यता आहे.
एखाद्या व्यक्तीने विकत घेतलेल्या शेअर्सवरील किंवा म्युच्युअल फंडावरील लाभांशाच्या स्वरूपात वर्षाला एक कोटी रुपयापेक्षा अधिक उत्पन्न मिळवले असेल तर त्या उत्पन्नावर १० टक्के कर लावला जाण्याची शक्यता आहे.