साठ तासानंतरही अजून आरोपी मोकाटच

पुणे , ˆ डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या घटनेला तीन दिवस लोटले तरी पोलीस अजून आरोपीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. पोलीसांची एकूण आठ पथके तपासाच्या कामात गुंतली आहेत दरन्यात आज कोणते तरी केंद्रीय पोलीस दर या चौकशीत भाग घेईल, अशी शक्यता मिर्माण झाली आहे. अजूनही मारेकर्‍यांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. समोरील कॉसमॉस बँकेचे सीसीटिव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने पुढील तपास आता प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावर अवलंबून असणार आहे. आत्तापर्यत चार प्रत्यक्षदर्शी पुढे आले असून त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे गुन्हे अन्वेशन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भांबरे यांनी सांगितले.

डॉ दाभोळकर यांच्या शिवनेरी बसमधून मुंबईवरून पुण्याला येताना कोणी पाठलाग करत असावेत, अशी शक्यता त्यातील काही प्रवाशांनी व्यक्त केली होती पण त्यानुसार तपास केल्यावर ती शक्यता पोलीसांनी नाकारली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मोटरसायकलचे मॉडेल, काही नंबर्सच्या कॉम्बिनेशन्सवरून पोलिसांनी काही मोटरसायकल आणि त्यांच्या मालकांची चौकशी सुरु केली आहे. पण दोन दिवस उलटल्यानंतर पोलिसांच्या हाती फक्त 49 मोटरसायकलींऐवजी दुसरे काहीच लागलेले नाही. पोलिसांच्या आवाहनानंतर मदतीसाठी जवळपास 60 फोन आले. त्यातील चार प्रत्यक्षदर्शी आहेत. तपास करणारे एक पथक आज सातार्‍याला रवाना झाले असून ते दाभोलकरांच्या कुटूंबियांशी चर्चा करणार आहे.

हल्लेखोर पाऊण तास महर्षी शिंदे पुलावर
डॉ. दाभोलकर यांचे हल्लेखोर मंगळवारी सकाळी 6.20 वाजता महर्षी शिंदे पुलावर आल्याचे तेथील कॉसमॉस बँकेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसले आहे. हल्लेखोरांची मोटारसायकल शिंदेपाराकडून महर्षी शिंदे पुलाकडे आली. सकाळी 7.14 वाजता दाभोलकर यांच्यावर गोळया झाडण्यात आल्या. त्यानंतर हल्लेखोर 7.17 वाजता माघारी जाताना दिसत आहेत. त्यामुळे हल्लेखोर डॉ. दाभोलकर येण्याची सुमारे 50 मिनिटांहून अधिक वेळ ते वाट पाहात होते. दाभोलकर पुढे गेल्यानंतर त्यांच्यावर पाठीमागून येऊन गोळ्या झाडल्या. ओंकारेश्वर मंदिराजवळ पोलिसांनी साखळी चोरीसाठीचा बंदोबस्त लावला होता. पण, हल्लेखोरांबाबत त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. सार्‍या परिस्थितीचा वेध घेता पोलिसांना अजून तपासाची दिशा मिळालेली नाही, असे सांगण्यात आले.

Leave a Comment