नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस जवानांचा मृत्यू

नारायणपूर, – छत्तीसगडमधील नक्षली प्रभावित नारायणपूर जिल्हयात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस जवानांचा मृत्यू झाला. हे जवान छत्तीसगड आर्म फोर्स (सीएएफ) चे जवान आहेत. ही घटना महराबेडा आणि कौशलनगर गावाजवळ घडली असल्याची माहिती पोलीस महासंचालक रामनिवास यांनी दिली.

या हल्ल्याविषयी माहिती देताना रामनिवास म्हणाले की, झारा पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवादविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. महराबेडा-कौशलनगर भागाजवळ पोलीस दलाचा ताफा पोहोचला त्यावेळी दबा धरून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी थेट पोलीस दलावर हल्ला चढवला. अचानक हल्ला झाल्याने पोलिसांना समजण्याआधीच या ताफ्यातील १६ व्या बटालियनचे तीन जवान या हल्ल्यात शहीद झाले.

ही घटना महराबेडा आणि कौशलनगर गावाजवळ घडली. नक्षली हल्ल्यात प्रत्यूत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला. तेव्हा नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला. त्या ठिकाणी पोलिसांना एका नक्षलवाद्यांचा मृतदेह सापडला. मात्र इतर नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. यापूर्वीपण पोलिसांवर नक्षलवादयांनी हल्ला् केला होता.